नवे संशोधन! कुक्कुटपालकांच्या नफ्यात होणार वाढ; अन् उत्पादन खर्चातही बचत

poltry.jpg
poltry.jpg

नाशिक : इथेनॉल निर्मिती प्रक्रियेत रिफायनरीत आढळणाऱ्या बायोमासमध्ये ८० टक्के प्रथिने आढळतात. या प्रथिनांचा वापर करून सोयाबीन खाद्याला पर्याय म्हणून दाणेदार कुक्कुटखाद्य तयार केले जाणार आहे. याबाबत केंद्रीय पक्षी संशोधन संस्थेच्या माध्यमातून संशोधन करण्यात येत आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन संस्थेसोबत नुकताच सामंजस्य करार झाला आहे. 

दाणेदार स्वरूपात खाद्यनिर्मिती

बायोमासमध्ये ८० टक्के प्रथिने तपासणीदरम्यान आढळून आल्यानंतर 'इंडियन ऑइल कॉर्पोरेशन'च्या फरिदाबाद येथील कार्यालयाने केंद्रीय पक्षी संशोधन संस्थेकडे निर्मिती प्रक्रियेसाठी मदत मागितली आहे. यापुढील वर्षाच्या आत ही संशोधन संस्था यावर काम करून त्यासंबंधीची उत्पादन प्रक्रिया तंत्रज्ञान आणणार आहे. यासंबंधी केंद्रीय पक्षी संशोधन संस्था जैवइंधनावर संशोधनकार्य करणार आहे. या घन स्वरूपाच्या टाकाऊ घटकात सापडणाऱ्या ८० टक्के प्रथिने आहेत. हे बायोमास इंडियन ऑइलच्या रिफायनरीमधून मिळणार आहेत. त्याचा वापर करून दाणेदार स्वरूपात खाद्यनिर्मिती केली जाणार आहे. या संशोधनातून या दाणेदार उत्पादनाचा वापर कसा केला जाणार याबाबत सविस्तर अहवाल देण्यात येणार आहे. 

उत्पादन खर्चात बचत होणार

ज्यामध्ये या जैविक उत्पादनाच्या संबंधित कुक्कुटखाद्यासाठी केला जाणारा वापर ज्यामध्ये खाद्य सुरक्षेची पातळी, चव व कोंबडा व कोंबडी यांच्या वाढीच्या अवस्थेतील परिणाम यासंबंधी मूल्यांकन करण्यात येणार आहे. व्यावसायिक कुक्कुटपालनात खाद्यामध्ये प्रथिनांचा वापर सर्वाधिक आहे. त्यामुळे इंडियन ऑइलच्या रिफायनरीमधून उपलब्ध होणाऱ्या बायोमासचा एक पर्याय, तसेच स्वस्त दरात प्रथिनांच्या स्वरूपात कुक्कुटखाद्यात वापर केला जाऊ शकणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होणार आहे. या संशोधनकार्याचा कालावधी एक वर्ष असणार आहे. त्यासाठी १० लाख ७४ हजार रुपये खर्च होणार आहेत. 

कुक्कुटपालकांच्या नफ्यात होणार वाढ 

कुक्कुटखाद्यात सोयाबीन हा प्रथिनांचा प्रमुख स्रोत आहे. त्यामुळे हे स्पर्धेत विकसित होत असलेले उत्पादन आहे. त्यामुळे बायोमासमधील प्रथिनांचा वापर करून दाणेदार खाद्यनिर्मिती झाल्यानंतर कुक्कुटपालकांना मका व सोयाबीन यांच्यावर कमी प्रमाणात अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत शक्य असून, उत्पन्नवाढीसाठी मदत होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

महाराष्ट्रातील डॉ. जयदीप रोकडे संशोधन समितीचे प्रमुख 

कराड (जि. सातारा) येथील व सध्या या संस्थेत कार्यरत डॉ. जयदीप रोकडे संशोधन समितीचे प्रमुख आहेत. सहप्रमुख संशोधक म्हणून डॉ. जगबीर सिंह त्यागी, डॉ. संदीप सरन, डॉ. प्रमोद कुमार त्यागी, डॉ. गोपी एम. यांचा सहभाग आहे. यासह इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून संशोधन व विकास विभागाचे संचालक डॉ. एसएसव्ही रामाकुमार, जी. एस. कपूर यांचाही समावेश आहे. 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन व केंद्रीय पक्षी संशोधन संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानुसार आमची संस्था यावर येत्या वर्षात बायोमासमधील प्रथिनांचा कुक्कुटखाद्यात वापर करण्यासंबंधीचे तंत्रज्ञान तयार करणार आहे. - डॉ. संजीव कुमार, संचालक, केंद्रीय पक्षी संशोधन संस्था, बरेली, उत्तर प्रदेश 

कुक्कुटखाद्यामध्ये प्रथिनांसाठी सोयाबीनचा वापर केला जातो. त्याच्यामुळे कुक्कुटखाद्याच्या दरात वाढ होते. हा प्रयोग जर यशस्वी झाला तर सोयाबीनचा वापर कमी होऊन शेतकऱ्यांचा नफा आणि उत्पादन वाढेल. - डॉ. जयदीप रोकडे, वैज्ञानिक, केंद्रीय पक्षी संशोधन संस्था, बरेली, उत्तर प्रदेश

संपादन - किशोरी वाघ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com