'माझी तक्रार केलीच कशी?' म्हणत पोलिस निरीक्षकाची माजी सैनिकाशी अरेरावी; वाचा काय घडले?

विनोद बेदरकर
Sunday, 13 September 2020

१२ ऑगस्टला गडकरी यांच्यासह सगळ्या हिस्सेदारांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर तेथे पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली म्हणून त्या रागातून निरीक्षक अनिल बोरसे यांनी अंगावर धावून जात अपशब्द वापरले. हा सगळा प्रकार श्री. गडकरी यांनी पुन्हा तत्कालीन अधीक्षक डॉ. आरती सिंह यांना सांगितला. 

नाशिक : घरगुती जमिनीच्या हिस्से वाटपात जमिनीवरील कब्जाबाबत दिंडोरी पोलिस ठाण्याचे निरीक्षकांकडून दखल घेतली गेली नाही म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली म्हणून पोलिस निरीक्षकाने माजी सैनिकाशी अरेरावी केली. त्यामुळे याप्रकरणी माजी सैनिकाने पोलिस तक्रार प्राधिकरण आणि राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली आहे. 

असा आहे प्रकार

माजी सैनिक कृष्णा गडकरी यांची शिवनई (ता. दिंडोरी) येथे सामाईक शेती आहे. सामायिक शेतीचे वाटप झालेले नसताना त्यातील काही हिस्सेदारांनी परस्पर सोयीनुसार जमीन कसायला सुरवात केली आहे. त्याला गडकरी यांचा विरोध आहे. कायदेशीर मोजणी झाल्याशिवाय अतिक्रमण किंवा दांडगाईने इतर हिस्सेदारांना जमीन कसण्यास प्रतिबंध करावा. बळजबरीने जमिनीत घुसणाऱ्यांना प्रतिबंध करून शांतता राखावी, असा दिंडोरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल बोरसे यांच्याकडे तक्रार अर्ज केला. पण पोलिस निरीक्षक बोरसे दखल घेत नसल्याने त्यांच्या विरोधात ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्याकडे तक्रार केल्याने, निरीक्षक श्री. बोरसे यांनी १२ ऑगस्टला गडकरी यांच्यासह सगळ्या हिस्सेदारांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर तेथे पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली म्हणून त्या रागातून निरीक्षक अनिल बोरसे यांनी अंगावर धावून जात अपशब्द वापरले. हा सगळा प्रकार श्री. गडकरी यांनी पुन्हा तत्कालीन अधीक्षक डॉ. आरती सिंह यांना सांगितला. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

पोलिस प्राधिकरणाकडे तक्रार 

निरीक्षक अनिल बोरसे यांच्या वर्तनाविषयी तक्रारदार गडकरी यांनी राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण आणि मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली आहे. दरम्यान, अधीक्षक डॉ. सिंह यांची बदली झाली असून, सहाय्यक अधीक्षक संदीप घुगे कामकाज पहात आहेत. श्री. घुगे यांनी नुकताच पदभार घेतला आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या विषयाची माहिती घेतली जाईल, असे 'सकाळ'ला सांगितले.  

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As reported to the Superintendent of Police, Dindori inspectors argue with ex-soldier nashik marathi news