सरपंचपदाच्या सोयीच्या आरक्षणासाठी इच्छुकांनी बुडवले देव पाण्यात! २८ ला जिल्हाभर सोडत

gram panchayat elections.jpg
gram panchayat elections.jpg

येवला (जि. नाशिक) : येत्या २८ जानेवारी रोजी सर्व तालुक्यातील सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत निघणार असून गावगाड्याच्या मिनी मंत्रालयाच्या सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्यांनी आपल्यास सोयीस्कर आरक्षण निघो,अशी आस उराशी बाळगत देव पाण्यात बुडवले आहेत. मागील पाच वर्षासाठीचे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षणाची मुदत संपल्याने आता २०२० ते २०२५ या पाच वर्षासाठी पुन्हा नव्याने सरपंचपदाचे आरक्षण ठरणार आहे.यासाठीचा मसुदा जिल्हाधिकारी कार्यालयाने ठरविला असून तब्बल ३८१ ग्रामपंचायतीची खुर्ची अनुसूचित जाती-जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव राहणार आहे.तर ४२९ ग्रामपंचायतीचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी ठरणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सोडत लांबली
जिल्ह्यातील १०८१ ग्रामपंचायतीच्या पुढील पाच वर्षाच्या सरपंचपदाची सोडत मार्चमध्ये होणार होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सोडत लांबली.त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ता.१४ जानेवारीचा मुहूर्त निश्चित झाला पण ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्याने तेव्हाही कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. आता २८ तारखेला जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयात आरक्षण सोडत निश्चित केली जाणार आहे.जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील ८१० ग्रामपंचायती असून यासाठी सरपंचपदाची सोडत काढली जाणार असून आदिवासी क्षेत्रातील पेठ,सुरगाणा,त्र्यंबकेश्‍वर येथील ग्रामपंचायतीचे आरक्षण निश्चित असल्याने या तालुक्याचा यात समावेश नाही.

तहसील कार्यालयात आरक्षण सोडत
प्रत्येक तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढली जाणार असून त्याच दिवशी याचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना कळवायचा आहे.अनुसूचित क्षेत्राबाहेरील ८१० पैकी अनुसूचित जातीसाठी ५४ तर जमातीसाठी ११० सरपंचपद आरक्षित होणार असून नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी २७ टक्के म्हणजेच २१८ सरपंचपद आरक्षित होतील.बागलाण, मालेगाव, चांदवड, निफाड, सिन्नर तालुक्यातील आरक्षित होणाऱ्या ग्रामपंचायतीची संख्या लोकसंख्येनुसार जास्त आहे.

५० टक्के ग्रामपंचायत महिलांसाठी आरक्षित

जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीची मुदत संपली असून येथील निवडणुका नुकत्याच झाल्याने आता सरपंच पद कुणासाठी अन कुणाच्या सोयीने आरक्षण निघते याविषयी उत्सुकता ताणली जात आहे.त्यामुळे या सरपंच सोडतीला विशेष महत्व आले आहे.आगामी पाच वर्षात निवडणुका होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीसाठी हे आरक्षण लागू होणार आहे.दरम्यान,या आरक्षनानंतर ५० टक्के ग्रामपंचायत महिलांसाठी आरक्षित केल्या जाणार असून त्याची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात निघणार असल्याचे समजते.

असे ठरेल आरक्षण...
तालुका – एकूण ग्रामपंचायती - अनुसूचित जाती - अनुसूचित जमाती - ओबीसी - सर्वसाधारण
देवळा - ४२ - १ - २ - ५ - १२
दिंडोरी - १२१ - १ - १ - ५ - १०
इगतपुरी - ९६ - २ - ३ - ९ - १८
बागलाण - १३१ - ४ - १२ - २२ - ४३
नाशिक - ६६ - ३ - ४ - ९ - १९
मालेगाव - १२५ - ८ - १९ - ३४ - ६४
चांदवड - ९० - ६ - १३ - २४ - ४७
नांदगाव - ८८ - ६ - १३ - २४ - ४५
निफाड - ११९ - ९ - १८ - ३२ - ६०
येवला - ८९ - ७ - १० - २४ - ४८
सिन्नर - ११४ - ७ - १४  - ३० - ६३
एकूण - १०८१ - ५४ - १०९ - २१८ - ४२९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com