अनलॉक लर्निंग...! साधनसंपत्ती समूहांची राज्यभर स्थापना होणार...

महेंद्र महाजन
रविवार, 2 ऑगस्ट 2020

सरकारी आश्रमशाळांमधील शिक्षक समूहासाठी व्यक्तींची निवड करतील, त्यांच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात राहतील. त्यामध्ये सरकारी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थी, शिक्षित पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविकांचा समावेश असेल. 

नाशिक : गाव आणि सरकारी आश्रमशाळांच्या सामिलकीमध्ये स्थानिक संसाधन समूहांचे योगदान मोलाचे राहणार आहे. अशा समूहांची स्थापना राज्यभर होणार असून आतापर्यंत ४० टक्के ठिकाणी समूहांची स्थापना झाली आहे.

शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी 'कनेक्ट' सुरु

आदिवासी विकास विभागाच्या ‘अनलॉक लर्निंग' प्रकल्पातंर्गत शिक्षक आणि समूहासाठी हस्तपुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोचले असून २५ ते ३० विद्यार्थ्यांची जबाबदारी एका शिक्षकांवर सोपवण्यात आली आहे. समूहातील शिक्षित व्यक्ती अर्थात, मुलींना तरुणी अथवा महिला, मुलांना तरुण अथवा पुरुष शिकवतील. तेही शारीरिक अंतर पाळून, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करुन. व्यावहारिक शिक्षणावर विशेष भर दिला जाईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीची पूर्वतयारी समूहातर्फे केली जाईल. त्यासाठीचे वेळापत्रक शिक्षक समूहाला देतील. 

प्रकल्पाचे वैशिष्टे

- मोबाईल नाही म्हणून शिक्षणापासून दूर याची शक्यता प्रकल्पातून राहणार नाही. 

- डिजीटलच्या बरोबर गुरुजनांचा संपर्क प्रकल्पाच्या केंद्रस्थानी आहे. 

- शिक्षक ७ ते १० दिवसांतून एकदा विद्यार्थ्यांची गृहभेट करतील. 

- भामरागड भागामध्ये गावात आठ दिवस राहू आणि मग पुन्हा पुढील पंधरा ते वीस दिवसांनी गावात जाऊ, असे पर्याय शिक्षकांनी सूचवले आहेत. 

- जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाच्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या नियमावलीच्या आधारे शिक्षणाची ही सारी व्यवस्था अवलंबून आहे. 

- ४९१ सरकारी वसतिगृहातील ४९१ गृहपाल गावात जाऊन विद्यार्थ्यांना माहिती देताहेत. 

- याशिवाय ५४ हजार वसतिगृहातील विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. त्यांची माहिती आदिवासी विकासच्या शिक्षण विभागाने संकलित केलेली आहे. 

४० टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईल
 
राज्यातील सरकारी आश्रमशाळेत शिकणाऱ्या ४० टक्के आदिवासी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाकडे मोबाईल आहे. वर्ग शिक्षकांना आपल्या वर्गातील मुलांच्या पालकांचे मोबाईल ग्रुप तयार केले आहेत. त्यावरुन शिक्षक दिक्षा ॲप, यु-ट्यूबवरील व्हिडीओ अशांची लिंक पाठवतात. पालक घरी असताना विद्यार्थ्यांनी पाहावे यासाठी शिक्षक माहिती देतात. सरकारी आश्रम शाळांच्या स्तरावरुन समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. मुख्याध्यापक अध्यक्ष आहेत. एक शिक्षक शिक्षणाचे नियोजन करतील. एक शिक्षक नियोजनाची देखरेख करतील. एक शिक्षक प्रत्यक्ष भेटी देतील. त्याचप्रमाणे दोन शिक्षक अथवा अधीक्षक शाळेतील ‘सपोर्ट सेंटर'मध्ये थांबतील. इथून विद्यार्थी, पालक, शिक्षक माहिती घेऊ शकतील. काही अडचण असल्यास ती सांगून त्याचे निराकारण करुन घेतील. 

संनियंत्रणाची व्यवस्था तयार 

‘अनलॉक लर्निंग' प्रकल्पाच्या संनियंत्रणासाठीची व्यवस्था तयार झाली आहे. अप्पर आयुक्त आणि प्रकल्पाधिकारीस्तरावर नोडल अधिकारी आणि त्यांच्यासाठी दोन अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून प्रत्येक गुरुवारी होणाऱया व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये अधिकारी सहभागी होतात. आता मुख्याध्यापक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी उपस्थित राहू लागले आहेत. दरम्यान, ॲप सुरु झाल्यावर शिक्षकांना आठवड्यातून एकदा माहिती भरायची आहे. त्यासाठी पाच मिनिटांचा कालावधी पुरेसा ठरणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण आवडते का? इथंपासून ते स्थानिक सहभाग आणि सूचना व अडचणीपर्यंतच्या प्रत्येक बाबींचा त्यात समावेश असेल. ॲपवर शाळास्तरावरील माहिती मुख्याध्यापक भरतील. प्रकल्पाधिकारी आणि अपर आयुक्तस्तरावर प्रकल्पासाठी भेटी देणारे सहाय्यक प्रकल्पाधिकारीस्तरावरुन अडचणींचा सोडवणूक केली जाईल. 

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

शिक्षणामध्ये घेणार आघाडी 

देशात आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये महाराष्ट्र आघाडी घेईल अशा पद्धतीने आदिवासी विकास विभागाचे नियोजन झाले आहे. टप्पानिहाय मूल्यमापनाची व्यवस्था विभागाने केली आहे. त्यासाठीच्या प्रश्‍नपत्रिका आयुक्तालयस्तरावर तयार होतील. गृहभेटीद्वारे प्रश्‍नपत्रिका विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतल्या जातील. हसत-खेळत आदिवासी विद्यार्थी शिक्षणाचा हा टप्पा आनंददायी असेल. 

हेही वाचा > सहा फुटांच्या खड्ड्यातून आली दुर्गंधी.. गावकऱ्यांना भलताच संशय....शोध घेताच गावात एकच खळबळ

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Resource groups will be set up across the state nashik marathi news