
सर्व सेवानिवृत्तांना वर्षातून एकदा नोव्हेंबर महिन्यात आपल्या हयातीचा दाखल सादर करावा लागतो. त्यासाठी ज्या बँक शाखेतून पेन्शनचे वितरण होते, तिथे जाणे बंधनकारक असते. तिथे जाऊन संबंधित कागदांवर सेवानिवृत्तांना स्वाक्षरी करावी लागते.
नाशिक : कोरोनाच्या काळात अनेक सरकारी कार्यलये आणि सुविधा केंद्रामध्ये नागरिकांना गैरसोय सहन करावी लागली आहे. यातच जेष्ठ नागरिकांना तर याचा जास्तच त्रास झाला आहे. दरम्यान टपाल विभागाने मात्र दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना खास गिफ्ट दिले आहे. आता हयातीचा दाखला किंवा डिजिटल जीवन प्रमाणपत्र घेण्यासाठी नागरिकांना बँकेत किंवा टपाल कार्यालयात जाण्याची गरज नाही. तर थेट टपाल कर्मचाऱ्यांना घरी बोलावून घरपोच दाखला मिळणार आहे. त्यामुळे सेवानिवृत्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.
असा मिळणार दाखला
सर्व सेवानिवृत्तांना वर्षातून एकदा नोव्हेंबर महिन्यात आपल्या हयातीचा दाखल सादर करावा लागतो. त्यासाठी ज्या बँक शाखेतून पेन्शनचे वितरण होते, तिथे जाणे बंधनकारक असते. तिथे जाऊन संबंधित कागदांवर सेवानिवृत्तांना स्वाक्षरी करावी लागते. इंडियन पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) अंतर्गत टपाल विभाग घरपोच जीवन प्रमाणपत्र देणार आहे. पोस्ट इन्फो हे अॅप वापरुन सेवानिवृत्तांना घरपोच सेवा मिळणार आहे.
हे अॅप डाउनलोड करा
त्यासाठी या अॅपमध्ये 'सर्व्हिस रिक्वेस्ट' या पर्यायावर क्लिक करून 'जीवन प्रमाणपत्र' हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर जवळच्या टपाल कार्यलायातील पोस्टमन स्वतः घरी येऊन आधार बायोमेट्रिक प्रमाणिकरणाद्वारे जीवन प्रमाणपत्र देऊ करेल.
हेही वाचा > विवाह समारंभाला आलेल्या कुटुंबियांना बनविला निशाणा! दहा लाखांहून अधिक ऐवज लंपास
ही माहिती देणे आवश्यक असेल
सर्व्हिस किंवा फॅमिली पेन्शनची कागदपत्रे, पेन्शन अदा करणारा विभाग कोणता, पेन्शन मिळणाऱ्या बँक अथवा टपाल कार्यालयाचा पत्ता, पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) क्रमांक, ज्या खात्यात पेन्शन जमा होते त्याचा खाते व खातेधारक क्रमांक, पेश्नरचा लाभ घेणाऱ्याचा मोबाइल आणि आधार क्रमांक केवळ इतक्याच माहितीची पूर्तता करायची आहे. यासह पीपीओ आणि आधारचा क्रमांक लिंक असणे अनिवार्य असून, पेन्शन देणाऱ्या संस्थेने डिजिटल दाखला ग्राह्य धरणे ही त्यांची जबाबदारी असेल. ज्येष्ठांना या सेवेसाठी सर्व करांसहित फक्त ७० रुपये शुल्क प्रतिदाखला टपाल विभागाला द्यावे लागेल . पोस्टमन घरपोच येऊन सर्व कागदपत्रांची पडताळणी करून दाखला देईल.
हेही वाचा > सिनेस्टाईल थरार! पोलिसांची चाहूल लागताच रिक्षाचालकाने ठोकली धूम; अखेर संशय खरा ठरला