पोलिस आयुक्तांनी ऐकले गाऱ्हाणे; जनता दरबारात २४ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना परत

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

तीनपासून तर सायंकाळी उशिरापर्यंत जनता दरबारात पोलिस आयुक्तांनी सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थित उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविले. उपस्थित नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या समस्या सोडविण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

नाशिक : (जुने नाशिक) पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी जनता दरबार उपक्रमात शनिवारी (ता. 11) भद्रकाली पोलिस ठाण्यात नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच या वेळी त्यांच्या हस्ते चोरीस गेलेला सुमारे २४ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला. वाचा काय घडले?

गृहरक्षक दलाच्या जवानांसह पोलिसांची लाठ्यांची सलामी

श्री. पांडे यांनी सकाळी दहा ते दुपारी एकपर्यंत भद्रकाली पोलिस ठाण्यातील कामाचा आढावा घेताना अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत सोडविण्याचे आश्‍वासन दिले. तीनपासून तर सायंकाळी उशिरापर्यंत जनता दरबारात पोलिस आयुक्तांनी सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थित उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविले. उपस्थित नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या समस्या सोडविण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तत्पूर्वी श्री. पांडे यांचे पोलिस ठाण्यात आगमन होताच त्यांना गृहरक्षक दलाच्या जवानांसह पोलिसांनी लाठ्यांची सलामी दिली. 

मुद्देमाल परत 

भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गुदाम फोडून चोरीस गेलेले २१ लाख ८८ हजार ५२ रुपयांचे १२५ एलईडी टीव्ही, प्रत्येकी ४० हजार किमतीच्या दोन दुचाकी, १२ हजार रुपयांचा मोबाईल, ६६ हजार ८१० रुपयांचे १८ कुकर आणि चार ताडपत्री, असा सुमारे २३ लाख ४६ हजार ८६१ रुपयांचा मुद्देमालाचा समावेश आहे. पोलिस आयुक्तांचे हस्ते जनता दरबारात पाचही मूळ मालकांना त्यांचा ऐवज परत करण्यात आला. नगरसेविका वत्सला खैरे, समिना मेमन, शहर-ए-खतीब हिसामोद्दीन खतीब, सतीश शुक्ल, अशोक पंजाबी, संजय खैरनार, चेतन शेलार, आसिफ मुलानी, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, अमोल तांबे, सहाय्यक पोलिस आयुक्त समीर शेख, मंगलसिंग सूर्यवंशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे, पोलिस निरीक्षक दत्ता पवार आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO

अधिकाऱ्यांच्या भेटी 

जनता दरबाराच्या निमित्ताने जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनीही भद्रकाली पोलिस ठाण्यातील पोलिस आयुक्तांच्या जनता दरबार उपक्रमाला सदिच्छा भेट दिली. येत्या ३० ऑक्टोबरला ईद-ए-मिलाद साजरी होणार आहे. त्यानिमित्ताने जुलूस काढण्यास परवानगी मिळावी यासाठी शहर-ए-खतीब तसेच सुन्नी मर्कजी सिरत कमिटीचे अध्यक्ष हिसामोद्दीन खतीब, एजाज मकरानी, शेखन खतीब आदींनी पोलिस आयुक्तांना निवेदन दिले.  

हेही वाचा > अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Returned stolen property worth Rs 24 lakh to citizens nashik marathi news