आश्चर्यच! गरिबांघरी मंगलाष्टकांची गुंज तर श्रीमंतांना मात्र प्रतिक्षाच..

lawns wedding.jpg
lawns wedding.jpg

नाशिक / मालेगाव : कोरोनामुळे लग्नसोहळ्यांना एप्रिल-मेमध्ये ब्रेक लागला होता. अनलॉक सुरू होताच ग्रामीण भागात लग्नसोहळ्यांची धूम सुरू झाली आहे. विशेषतः कसमादेत आदिवासी बांधवांचे लग्नसोहळे लक्ष वेधून घेत आहेत. मर्यादित पाहुण्यांच्या उपस्थितीत खर्च वाचवणारे हे सोहळे साध्या पद्धतीने गावागावांत व शेतमळ्यामध्ये होताना दिसत आहेत. यामुळे गरिबांघरी मंगलाष्टकांची गुंज तर श्रीमंत मात्र कोरोना हद्दपार होण्याची वाट पाहत असल्याचे चित्र आहे. 


मर्यादित मेनू खाताहेत भाव 
कोरोनामुळे सर्व क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला. तसा तो लग्नसोहळ्यांवर झाला. लॉकडाउनमुळे मार्च ते मे महिन्यातील लग्नसोहळे पुढे ढकलण्यात आले. जूननंतर मात्र मर्यादित वऱ्हाडींच्या उपस्थितीत लग्नांना सुरवात झाली. कोरोना नियंत्रणात येत नसल्याचे पाहून खोळंबलेले विवाह जुलैमध्ये उरकण्याची धूम सुरू झाली आहे. 


गाजावाजा नसल्याने अनेकांना कार्यक्रमांचा थांगपत्ताही नाही 

सामान्य कुटुंबीय व आदिवासी बांधवांमध्ये अशी लग्ने मोठ्या संख्येने होत आहेत. एरवीपेक्षा ७० टक्के कमी खर्चात हे कार्यक्रम होत आहेत. लग्नातील मेनूही कमी झाले आहेत. कसमादेत वरण, भात, उसळ व जिलबी एवढे मर्यादित मेनू भाव खात आहेत. गाजावाजा नसल्याने कार्यक्रमांचा अनेकांना थांगपत्ताही लागत नाही. 

जिलबी, मसालेभातची धूम 
आदिवासी समाजातील लग्नांमध्ये तर केवळ मसालेभात व जिलबी हे दोनच पदार्थ दिसत आहेत. मसालेभात घरी तयार करतात. तर जिलबी हॉटेलवरून आणली जाते. जिलबीच्या विक्रीमुळे ग्रामीण भागातील हॉटेल व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळत आहे. अवघ्या दहा ते वीस हजारांत लग्न पार पाडली जात आहेत. लग्नसोहळ्यांवर अवलंबून असलेले इतर घटकांचे मोठे नुकसान झाले असले तरी कुटुंबीयांची पैशांची मोठी बचत होत आहे. 


पुढील तारखा हेरल्या 
गेल्या चार ते सहा महिन्यांपासून लग्न जमलेल्या अनेकांना अजूनही कोरोना हद्दपारची प्रतीक्षा आहे. धामधुमीत लग्न करण्याची इच्छा असणाऱ्या श्रीमंतांनी आधी जूनपर्यंत लग्न पुढे ढकलले. कोरोनाचे वातावरण पाहून ही कुटुंबे आता दिवाळीनंतर लग्न करण्याच्या तयारीत आहेत. बहुतेकांनी नोव्हेंबर-डिसेंबरच्या तारखा हेरून ठेवल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com