अतिक्रमित शिवाररस्ते मोकळे! दिंडोरी तहसीलदार पंकज पवारांनी मिटविला वाद 

दिगंबर पाटोळे
Thursday, 29 October 2020

अनेक वर्षांपासून शेतीच्या हद्दीवरून वादाच्या भोवऱ्यात अडकून अतिक्रमित झालेला रामशेज गवळवाडी (ता. दिंडोरी) ते मखमलाबाद (ता. नाशिक) हा शीवपर्यंत रस्ता मोकळा करून देण्याबाबत शेतकऱ्यांची मागणी होती.

नाशिक/वणी : अनेक वर्षांपासून वादग्रस्त ठरलेला रामशेज-गवळवाडी ते मखमलाबाद-नाशिक हा दोन तालुक्यांना जोडणारा शिवाररस्ता, तसेच कोल्हेरपाडा (ता. दिंडोरी) येथील एक किलोमीटरचा शिवाररस्ता दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार यांनी शेतकऱ्यांमधील वाद मिटवीत खुला केला असून, लाभार्थी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. 

शंभर शेतकऱ्यांना लाभ

महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत अतिक्रमित शिवाररस्ते मोकळे करण्याची संकल्पना राबविली जात आहे. याच अनुषंगाने गेल्या अनेक वर्षांपासून शेतीच्या हद्दीवरून वादाच्या भोवऱ्यात अडकून अतिक्रमित झालेला रामशेज गवळवाडी (ता. दिंडोरी) ते मखमलाबाद (ता. नाशिक) हा शीवपर्यंत रस्ता मोकळा करून देण्याबाबत शेतकऱ्यांची मागणी होती. याबाबत तहसीलदार पवार, मंडळ अधिकारी बाबासाहेब खेडकर यांनी शेतकऱ्यांशी सकारात्मक चर्चा करून एक हजार ८०० मीटर (१.८ किलोमीटर) लांबीचा रस्ता मोकळा करून दिला. या रस्त्यामुळे शंभर शेतकऱ्यांना शेतात येण्या-जाण्याची सोय झाली असून, त्यामध्ये वनपट्टे मिळालेल्या ४७ आदिवासी शेतकरी बांधवांना याचा लाभ झाला आहे. 

हेही वाचा > भररस्त्यात थरार! गळ्याला लावली तलवार आणि घेतले पाच लाख; नागरिकांत दहशत

अनेक वर्षांपासून रस्त्यांचा वाद

कोल्हेरपाडा (ता. दिंडोरी) शिवारात शेतकऱ्यांच्या वादामुळे अतिक्रमित झालेल्या एक किलोमीटर रस्त्याबाबत तहसीलदार पवार यांनी स्वत: कोल्हेरपाडा येथे जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करीत वाद मिटविला. तहसीलदार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ व लाभार्थी शेतकऱ्यांनीच श्रमदानातून एक किलोमीटर अंतराचा रस्ता खुला केल्याने या रस्त्याचा ४० शेतकरी बांधवांना फायदा झाला आहे. अनेक वर्षांपासूनचा रस्त्यांचा वाद मिटल्याने रामशेज-गवळीपाडा व कोल्हेरपाडा येथील ग्रामस्थांनी तहसीलदार पंकज पवार यांचे कौतुक केले. 
 

हेही वाचा > दुर्दैवी! शेतातील ती भातकापणी ठरली शेवटची; तरुण शेतकरीच्या बातमीने गाव हळहळले

गेल्या अनेक वर्षांपासून शीवरस्त्यात अतिक्रमण होऊन रस्ता बंद झाल्यामुळे शेतात जाण्यावरून कायम वाद होत. अनेक दिवसांची रस्त्याची मागणी पूर्ण झाल्याने समाधान वाटत आहे. 
-बाळू चारोस्कर, शेतकरी गवळीपाडा (रामशेज) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road dispute settled in wani nashik marathi news