आरटीई प्रवेश : प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना गुरुवारपर्यंत प्रवेशाची मुदत 

अरुण मलाणी
Saturday, 3 October 2020

शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पहिल्‍या सोडतीतील प्रवेशप्रक्रियेनंतर आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जात आहे. याअंतर्गत प्रतीक्षा यादीत नावे असलेल्‍या व एसएमएस प्राप्त झालेल्‍या विद्यार्थ्यांच्‍या पालकांनी येत्‍या गुरुवारपर्यंत प्रवेश निश्‍चित करायचे आहेत.

नाशिक : शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पहिल्‍या सोडतीतील प्रवेशप्रक्रियेनंतर आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जात आहे. याअंतर्गत प्रतीक्षा यादीत नावे असलेल्‍या व एसएमएस प्राप्त झालेल्‍या विद्यार्थ्यांच्‍या पालकांनी येत्‍या गुरुवार (ता. ८)पर्यंत प्रवेश निश्‍चित करायचे आहेत. लॉगइन आयडीद्वारे माहिती पडताळून पुढील कार्यवाही करण्याच्‍या सूचनादेखील दिल्‍या आहेत. दरम्‍यान, आतापर्यंत तीन हजार ६८५ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्‍चित केले आहेत. 

जिल्ह्यात तीन हजार ६८५ प्रवेश निश्‍चित 
नाशिक जिल्ह्यातील ४४७ खासगी शाळांमध्ये ‘आरटीई’अंतर्गत पंचवीस टक्‍के राखीव जागांमध्ये पाच हजार ५५७ जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. या जागांसाठी ऑनलाइन स्‍वरूपात १७ हजार ६३० प्रवेश अर्ज दाखल झाले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रवेशप्रक्रिया मंदावली असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अर्धे सत्र संपत आले असताना जिल्ह्यातील दीड हजाराहून अधिक जागा अद्यापही रिक्‍त आहेत. 
पहिल्‍या सोडतीतील विद्यार्थ्यांना सप्‍टेंबरअखेर मुदत दिली होती. ही मुदत संपल्‍यानंतर आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चितीची मुदत दिली जात आहे. पहिल्‍या सोडतीत पाच हजार ३०७ नावांचा समावेश होता. या यादीतील प्रवेशांसह प्रतीक्षा यादीतील काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात तीन हजार ६८५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत. 

हेही वाचा > पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैधरित्या वाहतूक; औरंगाबाद-अहवा महामार्गावरील धक्कादायक प्रकार

शाळांमध्ये गर्दी न करण्याचे आवाहन 
शाळांमध्ये शिल्‍लक राहिलेल्‍या रिक्‍त जागांनुसार पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाची तारीख कळविली जाणार आहे. परंतु पालकांनी फक्त त्यावर अवलंबून राहू नये. पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याची तारीख पाहता येणार आहे. शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांनी गर्दी करू नये तसेच प्रवेश घेण्यासाठी बालकांना सोबत घेऊन जाऊ नये, असेही शिक्षण विभागाने स्‍पष्ट केले आहे. पालकांनी शाळेत प्रवेशाकरिता लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती, आरटीई पोर्टलवरील हमीपत्र आणि अर्जाची स्थिती या टॅबवर क्‍लिक करून हमीपत्र आणि अलॉटमेंट लेटरची प्रत शाळेत घेऊन जायची आहे.  

हेही वाचा > माजी सरपंचाच्या पुतण्याचा खून; नदीपलीकडे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTE Admission deadline for students on the waiting list is Thursday nashik marathi news