क्रिसिल मानांकनाच्या आधारे कर्ज काढण्याची भाजपची तयारी; शासनाची परवानगी राहणार बंधनकारक 

विक्रांत मते
Saturday, 16 January 2021

शहरातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून तीनशे कोटींचे कर्ज काढण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. क्रिसिल या वित्तीय संस्थेकडून ‘ए ए मायनस’ मानांकनाच्या आधारे कर्ज काढले जाणार आहे.

नाशिक : शहरातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून तीनशे कोटींचे कर्ज काढण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. क्रिसिल या वित्तीय संस्थेकडून ‘ए ए मायनस’ मानांकनाच्या आधारे कर्ज काढले जाणार आहे. भाजपकडून तीनशे कोटींच्या कर्जाचा दावा केला जात असला तरी दोनशे कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध होणार असून, त्यासाठी शासनाच्या परवानगी बंधनकारक असल्याने सत्ताधारी भाजपची अडचण होणार आहे. 

२०१७ मध्ये महापालिकेत भाजपची पूर्ण बहुमताने सत्ता आली. २०१८ मध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विकासकामांना ब्रेक लावला, तर २०२० कोविडमुळे वाया गेले. पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका असल्याने वर्षभरात प्रकल्प मार्गी लागणे गरजेचे आहे. उत्पन्नात घट झाल्याने विकासकामांसाठी निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपने तीनशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्याची तयारी केली आहे. त्यासाठी सिंहस्थात प्रकल्पांच्या आधारे काढलेल्या कर्जाचा आधार घेतला जात असून, क्रिसिलने त्यावेळच्या ए ए मायनस मानांकन दिले होते. पुन्हा प्रकल्प पूर्णत्वाच्या आधारे ए ए मायनस मानांकन देण्यात आले आहे. त्याच आधारे कर्ज काढले जाणार आहे. 

हेही वाचा >  देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस

परवानगीबाबत साशंकता 

प्रथम महासभेची परवानगी घ्यावी लागणार आहे. महासभेच्या परवानगीनंतर शासनाची मंजुरी आवश्‍यक राहणार आहे. परंतु, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने कर्ज काढण्यासाठी परवानगी मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे. 

शिवसेनेचा असमंजसपणा : महापौर 

सध्या महापालिकेवर कुठलेच दायित्व नसल्याने विकासकामे मार्गी लावण्यासाठी कर्ज काढणे गैर नाही. कोरोनामुळे वैद्यकीय कारणास्तव निधी खर्च झाला. पुढील वर्षी निवडणुकांना सामोरे जावे लागणार असल्याने विकासकामे होणे गरजेचे आहे. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी महापालिकेला कर्जाच्या खाईत लोटणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. परंतु, ही बाब वस्तुस्थितीला धरून नाही. वास्तविक, विकासकामे सर्वच नगरसेवकांच्या प्रभागात होणार आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात कामे करायची नसतील तर त्यांनी लेखी पत्र द्यावे, अशी खोचक सूचना महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली आहे. महसूलवाढीसाठी नागरिकांवर वसुलीसाठी सक्ती करणे कितपत योग्य होणार याचे उत्तर श्री. बोरस्ते यांनी द्यावे. यापूर्वीही महापालिकेने कर्ज घेतले व परतफेड देखील झाली. उत्पन्नवाढीसाठी बीओटी तत्त्वावर प्रकल्प होणार असून, महापालिकेला कुठलाही खर्च येणार नाही. उलट उत्पन्न वाढणार असल्याचा दावा महापौर कुलकर्णी यांनी केला. कर्ज काढण्यास होणारा विरोध असमंजपणा आहे. दत्तक पित्याने नाशिकसाठी काय केले आहे, हे निओ मेट्रो प्रकल्प व वाहनतळ प्रकल्प जाणीवपूर्वक रखडून ठेवणाऱ्यांना काय समजणार, असा खोचक टोला महापौर कुलकर्णी यांनी बोरस्ते यांना लगावला. 

हेही वाचा >  लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ruling BJP in Nashik Municipal Corporation is preparing to take a loan of 300 crore marathi news