एक आठवण! सचिनचे दातृत्व अन् विशेष मुलांसाठी साकारले प्रशिक्षण केंद्र! 

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 24 April 2020

2017 मध्ये या निधीतून कामाला सुरवात झाली अन्‌ आज अंगणगाव येथील मायबोली कर्णबधिर विद्यालयाच्या आवारात भव्य इमारतीत बहुउद्देशीय अपंग निवासी कार्यशाळेचा तिसरा मजला पूर्ण झाला. या ठिकाणी या विशेष मुलांना संगणक, प्रिंटिंग प्रेस, पैठणी विणकाम, वेल्डिंग असे व्यवसाय प्रशिक्षण दिले जात असून, या मुलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा संस्थेचा हा प्रयत्न आहे. या इमारतीत सचिनच्या चित्ररूपी आठवणीदेखील जागवल्या असून, उद्‌घाटनासाठी संस्थाध्यक्ष अर्जुन कोकाटे यांनी सचिन तेंडुलकर यांना निमंत्रण दिले असून, त्यांच्या हस्ते लवकरच या इमारतीचे लोकार्पणदेखील होणार आहे.

नाशिक / येवला : मैदानावर भल्याभल्याची भंबेरी उडविणारा क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर जसा मैदानावर राज्य गाजवतो, तसाच वास्तविक जगातही. दिव्यांगांच्या विकासासाठी संस्था झटतेय म्हणून आपल्या निधीतून 40 लाखांचा निधी देणारा खासदार सचिन तेंडुलकर यांच्या दातृत्वातून येवल्याच्या विशेष मुलांसाठी भव्य इमारत साकारली आहे. शुक्रवारी (ता.24) क्रिकेटचा देव असलेल्या सचिनचा वाढदिवस... त्यानिमित्त त्याच्या या दातृत्वाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. 

स्वयंरोजगार, व्यवसाय प्रशिक्षण व पुनर्वसनासाठी दीड कोटीचा आराखडा
विशेषतः मूकबधिर मुलांचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन डोळ्यांसमोर ठेवून समता प्रतिष्ठान ही संस्था मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालय या विशेष शाळेच्या माध्यमातून 25 वर्षांपासून काम करत आहे. विद्यालयात निवासी विद्यार्थी शिकताहेत. यातील काही मुलांना शासकीय अनुदान मिळत असल्याने उर्वरित मुलांच्या गरजा भागविण्यासाठी संस्थेला लोकाश्रयाची मदत घ्यावी लागते. या मुलांच्या भावी आयुष्याला आकार देण्यासाठी स्वयंरोजगार, व्यवसाय प्रशिक्षण आणि पुनर्वसन करण्यासाठी दीड कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी संस्था दानशूरांच्या मदतीतून प्रकल्प उभारत आहे. 

खासदार निधीतून 40 लाखांचा निधी मंजूर
याच प्रयत्नांचा भाग म्हणून भारतरत्न खासदार सचिन तेंडुलकर आपल्याला नक्कीच मदतीचा हात दाखवत विश्‍वासाने संस्थेचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे व कवी अरुण म्हात्रे यांनी सचिनचे थोरले बंधू नितीन तेंडुलकर यांची भेट घेतली. त्यांनी या शाळेचे कार्य जाणून घेऊन संबंधित प्रस्ताव खासदार सचिन यांच्याकडे पाठविला. त्यानंतर तीन महिन्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला या शाळेची इमारत व मूकबधिर मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या खासदार निधीतून 40 लाखांचा निधी मंजूर केला. 

हेही वाचा > धक्कादायक! "पुढच्या जन्मी आपण एकाच आईच्या पोटी जन्म घेऊ"..चिठ्ठीत कोरोनाची भीती अन्‌ नैराश्‍य ​

साकारले प्रशिक्षण केंद्र 
2017 मध्ये या निधीतून कामाला सुरवात झाली अन्‌ आज अंगणगाव येथील मायबोली कर्णबधिर विद्यालयाच्या आवारात भव्य इमारतीत बहुउद्देशीय अपंग निवासी कार्यशाळेचा तिसरा मजला पूर्ण झाला. या ठिकाणी या विशेष मुलांना संगणक, प्रिंटिंग प्रेस, पैठणी विणकाम, वेल्डिंग असे व्यवसाय प्रशिक्षण दिले जात असून, या मुलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा संस्थेचा हा प्रयत्न आहे. या इमारतीत सचिनच्या चित्ररूपी आठवणीदेखील जागवल्या असून, उद्‌घाटनासाठी संस्थाध्यक्ष अर्जुन कोकाटे यांनी सचिन तेंडुलकर यांना निमंत्रण दिले असून, त्यांच्या हस्ते लवकरच या इमारतीचे लोकार्पणदेखील होणार आहे. 

हेही वाचा > VIDEO : "सावरा..पोलीसांवर धावून गेलात..तर त्याची गय केली जाणार नाही" 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin's charity and training center for special children at yeola nashik marathi news