धक्कादायक! "पुढच्या जन्मी आपण एकाच आईच्या पोटी जन्म घेऊ"..चिठ्ठीत कोरोनाची भीती अन्‌ नैराश्‍य 

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 22 April 2020

मंगळवारी लक्ष्मणच्या आजीचा दशक्रिया विधी होता. कुटुंबातील ठराविक लोकांसह पहाटेच देवनदीच्या तीरावर विधी आटोपत असताना पिंडदान व केस काढण्यासाठी जेव्हा लक्ष्मणला बोलावले तेव्हा तो हजर नव्हता. भाऊ सुदाम हा घरी गेला असता, त्याला अंथरुणात चिठ्ठी मिळाली. त्याने धावत जाऊन संबंधित बाब कुटुंबातील लोकांना सांगितल्यावर शोधाशोध सुरू झाली.

नाशिक/सिन्नर​ : लॉकडाउनमुळे पोटाची भ्रांत, कायदेशीर परवानगीसाठी केलेला अर्जही बेदखल, आता काय करायचे, या नैराश्‍यातून जळगाव जिल्ह्यातील रहिवासी व एनडीएमव्हीपी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थ्याने नाशिकमध्ये, तर काळजी घेऊनही "कोरोना' झाल्याच्या संशयातून आजीच्या दशक्रिया विधीच्या अगोदर तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सिन्नर तालुक्‍यात घडली. 

आजीचा दशक्रिया विधी होण्याआधीच त्याने आटोपले स्वत:ला
तीन-चार दिवसांपासून घसा दुखत असल्याने आपल्याला "कोरोना' झाला असावा, या धास्तीने तालुक्‍यातील शहापूर (दातली) येथील लक्ष्मण नामदेव बर्डे (वय 31) या तरुणाने मंगळवारी (ता. 21) पहाटे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी लक्ष्मणच्या आजीचा दशक्रिया विधी होता. कुटुंबातील ठराविक लोकांसह पहाटेच देवनदीच्या तीरावर विधी आटोपत असताना पिंडदान व केस काढण्यासाठी जेव्हा लक्ष्मणला बोलावले तेव्हा तो हजर नव्हता. भाऊ सुदाम हा घरी गेला असता, त्याला अंथरुणात चिठ्ठी मिळाली. त्याने धावत जाऊन संबंधित बाब कुटुंबातील लोकांना सांगितल्यावर शोधाशोध सुरू झाली. दातली शिवारातील शिवाजी गुरूळे यांच्या शेतात आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत लक्ष्मणचा मृतदेह आढळून आला. एमआयडीसी पोलिस ठाण्यात भाऊ सुदाम याने फिर्याद नोंदविली. हवालदार लक्ष्मण बदादे यांनी त्वरित घटनास्थळी येऊन चौकशी केली. गेल्या तीन- चार दिवसांपासून मृत लक्ष्मणच्या घशात थोडा त्रास होत होता. त्या धास्तीने त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले, अशी चर्चा होती. मृत लक्ष्मण हा एकलव्य आदिवासी संघटनेचा तालुका उपाध्यक्ष होता. 

चिठ्ठीत भीती अन्‌ नैराश्‍य 
कोरोना आजार होऊ नये म्हणून सर्वांनी गरम पाणी प्यावे. मी खूप काळजी घेतली; पण यश आले नाही म्हणून आता मी देवाकडे कोरोना होऊ नये, याचे साकडे घालायला चाललो आहे, असे मृत लक्ष्मण याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. मृत लक्ष्मण याने चिठ्ठीत आपला मित्र रवी यालाही उद्देशून म्हटले, की मी देवाला सर्वांना सुखी ठेवण्याची विनंती करायला चाललो आहे. तू सर्वांची काळजी घे. पुढच्या जन्मी आपण एकाच आईच्या पोटी जन्म घेऊ. तू माझा मोठा भाऊ हो.  

पोटाची भ्रांत.."कोरोना'चा संशय.. ​
नाशिक शहरातील एनडीएमव्हीपी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थ्याने लॉकडाउनमुळे नैराश्‍यातून मंगळवारी (ता. 21) सकाळी अकराला राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. रुपेश भरत पाटील (वय 22, रा. पुष्पराज ऍनेक्‍स, पाइपलाइन रोड, नाइस वजन काट्याजवळ, सातपूर) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. रुपेश याचे लॉकडाउनमुळे जेवणाचे हाल होत होते. तर त्याच्या कुटुंबीयांनी जळगाव पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे 14 एप्रिलला अर्ज करीत त्यांच्या दोन्ही मुलांना आणण्याची परवानगी मागितलेली होती. मात्र, त्यांनी नाकारली होती. 

हेही वाचा > एक सुशिक्षित डॉक्टर अन् तान्ह्या जुळ्या मुलांची आई आणि आत्महत्या??? गूढ काय?

जळगाव पोलिसांनी नाकारली परवानगी 
नाशिकमध्ये अडकून पडलेल्या दोन्ही मुलांसाठी भरत पाटील यांनी जळगाव पोलिस अधीक्षकांकडे 14 एप्रिलला अर्ज केला होता. सदरच्या अर्जानुसार त्यांनी शिक्षणासाठी नाशिकमध्ये अडकून असलेल्या मुलांच्या जेवणाचे हाल होत असल्याचे स्पष्ट करीत, 18 एप्रिलला वाहनचालक समाधान भोईसह स्वतः भरत पाटील असे दोघांना नाशिकला जाण्याची आणि 19 एप्रिलला दोन्ही मुले मयूर व रुपेश, चालक भोई व स्वतः असे चौघांना परत येण्याबाबत परवानगी मागितली होती. परंतु जळगाव अधीक्षक कार्यालयाकडून सदरचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यामुळे दोन दिवसांपासून रुपेश तणावाखाली आला होता आणि त्याच नैराश्‍यातून त्याने आत्महत्या केली असल्याचे आप्तस्वकीयांकडून सांगण्यात आले. 

हेही वाचा > नियतीचा क्रूर डाव! शाळेला सुट्टया म्हणून तलावाकडे गेलेल्या चिमुरड्याची आली अशी बातमी..कुटुंबियांचा आक्रोश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two youths commit suicide in Nashik-Sinnar marathi crime news