महामार्ग नव्हे मृत्यूमार्ग! साक्री ते शिर्डी महामार्गावर खड्डेच खड्डे; तरीही प्रशासनाकडून डोळेझाकच

रणधीर भामरे
Sunday, 27 September 2020

पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे हा महामार्ग नसून मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे वाहनधारकांचे मोठे नुकसान होत आहे. खड्डे टाळण्याच्या नादात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक वाहनधारक पाठदुखीने त्रस्त झाले आहेत. 

नाशिक : (वीरगाव) साक्री ते शिर्डी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ वर सटाणा ते ताहाराबाददरम्यान खड्ड्यांचे साम्राज्य असल्यामुळे या मार्गावर आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकवेळा मागणी करूनही संबंधित विभागाकडून डोळेझाक होत असून, या प्रश्नावर लोकप्रतिनिधीही मूग गिळून बसल्याचा आरोप होत आहे. 

खड्डे टाळण्याच्या नादात अनेकांचा गेला जीव 

'बांधा, वापरा व हस्तांतरित करा' या बीओटी तत्त्वावर या रस्त्याचे काम राज इन्फ्रा या कंपनीने केले होते. कालांतराने राज इन्फ्रा या कंपनीकडून राम इन्फ्रा या कंपनीकडे या रस्त्याची देखाभाल दिली. मात्र, या मार्गावरील टोल बंद पडल्यामुळे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाला होता. या सर्व कालखंडात रस्त्याची वेळोवेळी डागडुजी होत असल्यामुळे या रस्त्याची अवस्था नसल्यापेक्षा बरी होती. मात्र, गत काही दिवसांपूर्वीच हा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग झाला आहे. पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे हा महामार्ग नसून मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे वाहनधारकांचे मोठे नुकसान होत आहे. खड्डे टाळण्याच्या नादात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक वाहनधारक पाठदुखीने त्रस्त झाले आहेत. 

लोकप्रतिनिधीही मूग गिळून गप्पच
 
काही दिवसांपूर्वी औंदाणे (ता. बागलाण)जवळच खड्डे टाळण्याच्या नादात दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक होउन दोघांना जीव गमवावा लागला. तर यशवंतनगरनजीक खड्डा टाळण्याच्या नादात दुचाकी व कार यांच्यात अपघात होऊन दुचाकीस्वारास आपली स्मरणशक्ती गमवावी लागली आहे. दोन दिवसांपूर्वी वनोलीनजीक ट्रक व पिक-अपच्या अपघातात पिक-अपमधील तिघांचा जीव गेला. या रस्त्यावर रोजच लहान- मोठे अपघात होतात. यास जबाबदार कोण, हाच खरा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याविषयी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, हा रस्ता आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग झाल्याचे उत्तर मिळाले. महामंडळाच्या व्यवस्थापकास विचारले असता, आमच्याकडे या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम असून डागडुजीशी कुठलाही संबंध नसल्याचे सांगितले. रस्त्याची जबाबदारी स्वीकारून डागडुजी करावी व होणारे अपघात टाळावे, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे. 

हेही वाचा > तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक निरापराधांचे बळी गेले आहेत. तसेच अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. लवकरात लवकर संबंधितांनी रस्त्याचे काम पूर्ण करावे अन्यथा आंदोलन करू. जबाबदारी स्वीकारून पुढील अपघात टाळावेत. - संजय चव्हाण, माजी आमदार बागलाण 

पावसाच्या अतिप्रमाणामुळे रस्त्यावरील खड्डे बुजण्यास अडथळा निर्माण होत असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात खड्ड्यांमध्ये मुरुम टाकला जातो. मात्र, रहदारीचे प्रमाण व पावसाच्या अतिप्रमाणामुळे बुजलेले खड्डे पूर्ववत होतात. पावसाचे प्रमाण कमी होताच खड्डे बुजविण्याचे काम सुरू करू. 
- अशोक गायकवाड, व्यवस्थापक, रस्ते विकास महामंडळ  

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakri to Shirdi Highway The pits became the way of death nashik marathi news