एकजुटीची वज्रमूठ! गावाने कोरोनामुक्तीसाठी ग्रामस्वच्छतेतून जपला आरोग्याचा मूलमंत्र; वाचा सविस्तर

sakure.jpg
sakure.jpg

नाशिक : (अस्वली स्टेशन) गेल्या सात महिन्यांपासून संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले असताना असंख्य जनता दाराआड बंद झाली, पण जीवघेण्या आजाराच्या प्रादुर्भावापासून गावाला वाचविण्यासाठी साकूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, अंगणवाडीसेविका, आशा वर्कर्स, सामाजिक कार्यकर्ते, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांचे असंख्य हात पुढे आले. ज्यांनी मागील सात महिन्यांत अहोरात्र मेहनतीने गावात गटारी, रस्ते, मोकळ्या जागा, शाळेचे पटांगण स्वच्छ केले. कोरोना संकटामुळे गावाच्या एकजुटीची वज्रमूठ पाहायला मिळाली. 

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण

साकूर हे पावसाळी भागातील गाव. पावसाळ्यात या भागात रस्त्यापासून तर मूलभूत सोयी-सुविधांपासूनचे प्रश्‍न गंभीर होतात. त्यात सहा महिन्यांच्या लॉकडाउनकाळात गावांच्या अर्थव्यवस्था मोडकळीस आल्या. या सगळ्याच परिस्थितीत ग्रामपंचायतीने वंचित आदिवासी कातकरी समाजातील गरीब कुटुंबांना अन्नधान्य वाटप केले. गावात फवारणी करून गाव पूर्णतः निर्जंतुकीकरण करून ग्रामपंचायतीतर्फे सॅनिटायझर, मास्क वाटण्यात आले. नागरिकांची आरोग्य तपासणी झाली. लॉकडाउनच्या काळात दरम्यानच्या काळात वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्रभर प्रचार-प्रसार करणारे हभप सोपान महाराज सहाणे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाल्यानंतर न्यूमोनियामुळे दोनच दिवसांत मृत्यू झाल्याने समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या वारकऱ्यांवर अशी वेळ आल्याने ग्रामस्थांनी चटका लावणाऱ्या या घटनेनंतर कोरोनाशी संघर्ष सुरू केला. त्यानंतर मात्र बाधित निघालेले सर्व रुग्ण कोरोनाशी लढा देण्यात यशस्वी ठरले. यात संपूर्ण ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. 

बारमाही पाणी उपलब्ध

दारणा धरणाच्या कुशीत साकूर वसलेले असल्याने बारमाही पाणी उपलब्ध आहे. शेती हा गावाचा प्रमुख व्यवसाय असून, भात, ऊस, टोमॅटे, काकडी, वांगे, भेंडी इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते, तसेच गाय, म्हैस, बैल, शेळी हे मुख्य पाळीव प्राणी असल्याने दुग्धव्यवसायही लक्षणीय आहे. मारुती मंदिरातील लाकडी कोरीवकाम आणि सदोबा मंदिर परिसरातील टेकडीवरील निसर्ग प्रेक्षणीय आहे. राजकीयदृष्ट्या सजगता आणि विकासकामांमुळे साकूरला 'इगतपुरीची बारामती' म्हणून ओळखले जाते. मारुती मंदिरात गीताजयंतीनिमित्त हरिनाम सप्ताह, सदोबा मंदिरात माघ शु. नवमी आणि दशमीला परिसरातील सर्वांत मोठी यात्रा भरते. यात्रेत सदोबा महाराजांचा संदल, कुस्त्यांची दंगल, लोककला, लोकनाट्य आदी आकर्षणीय असतात. भवानी मंदिरात नवरात्र, मरीमाता मंदिरात आषाढ महिन्यात उत्सव भरतो. 

द्वादशीला अन्नदानाचा मान पूर्वापार

आषाढ महिन्यातील मंगळवार आणि लगतच्या दोन अमावस्यांना गावात शेतीकामाला पूर्ण मोढा पाळतात. अनेक वर्षांपासूनची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाची जुनीजाणती ज्येष्ठ वारकरी मंडळी असल्याने नित्यनेमाने हरिपाठ, काकडा, भजन चालू आहे. दर वर्षी निवृत्तिनाथ यात्रेनिमित्त साकूर ते त्र्यंबकेश्वर 'चांगावटेश्वर पायी दिंडी सोहळा' आयोजित केला जातो. आषाढ कृ. एकादशीला निवृत्तिनाथ मंदिर, त्र्यंबकेश्वर येथे वारीची पूजा आणि द्वादशीला अन्नदानाचा मान पूर्वापार साकूरला असून, तो आजही अव्याहतपणे सुरू आहे. 

लॉकडाउन सुरवातीच्या काळात गावात काही रुग्ण आढळले. मात्र आम्ही उपाययोजना वाढवून जनजागृती करीत स्वच्छतेवर सर्वाधिक भर दिला. बाहेरील व्यक्तीस गावबंदी, सॅनिटायझर, मास्कवाटप, गाव निर्जंतुकीकरण केल्यामुळेच बाधित रुग्ण सापडूनही कोरोनावर नियंत्रण मिळवणे व गाव कोरोनामुक्त करणे शक्य झाले आहे. - विनोद आवारी, सरपंच, साकूर 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या मदतीने ग्रामस्वच्छतेतून प्रभावी अंमलबजावणी केली. गाव कोरोनामुक्तही झाले, मात्र कोरोनामुळे साकूर गावाचे भूषण असलेले वारकरी संप्रदायाचे अनुयायी सोपान महाराजांनी जीव गमावल्याचे दुःख हे कायम मनात राहणार आहे. - तुकाराम सहाणे, सदस्य, ग्रामपंचायत साकूर  

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com