इथं कुंपणच खातंय शेत.. सरपंचाचा पतीच चोरीचा सूत्रधार! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जुलै 2020

सवंदगाव शिवारात सर्रास अवैध वाळू व अन्य गौण खनिजची चोरी होते. 5 जुलैला मंडल अधिकारी पाहाणी करीत असताना त्यांना  तीनशे ते साडेतीनशे ब्रास माती काढून सपाटीकरण केलेले आढळले. महसूल विभागाने तहसीलदार यांच्या आदेशानुसार चौकशी केली असता जे समोर आले ते धक्कादायकच... 

नाशिक / मालेगाव : सवंदगाव शिवारात सर्रास अवैध वाळू व अन्य गौण खनिजची चोरी होते. 5 जुलैला मंडल अधिकारी पाहाणी करीत असताना त्यांना  तीनशे ते साडेतीनशे ब्रास माती काढून सपाटीकरण केलेले आढळले. महसूल विभागाने तहसीलदार चंद्रजित राजपूत यांच्या आदेशानुसार चौकशी केली असता जे समोर आले ते धक्कादायकच... 

कुंपणच खातंय शेत 
मालेगाव शहराजवळील सवंदगाव शिवारातील गिरणा पाटबंधारे विभाग जळगाव यांच्या ताब्यातील क्षेत्रासह स्वमालकीच्या शिवारातून अवैधरित्या गौण खनिज चोरी करून तब्बल साडेचार लाख रुपये किमतीच्या 75 ब्रास मातीमिश्रित वाळूचा साठा व गौण खनिज चोरीप्रकरणी सवंदगावच्या सरपंच अनिता शेवाळे यांचे पती गोरख शेवाळे यांच्यासह चौघांविरुद्ध पवारवाडी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. सरपंचांचे पतीच चोरीचे सूत्रधार असल्याने अवैध गौण खनिज चोरीचा हा प्रकार कुंपणच शेत खात असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. 

हेही वाचा > नाशिक दत्तक घेणारे कुठे गेले?...शिवसेनेचा सवाल

माती काढून सपाटीकरण 
सवंदगाव शिवारात सर्रास अवैध वाळू व अन्य गौण खनिजची चोरी होते. 5 जुलैला मंडल अधिकारी रामचंद्र पवार, तलाठी नामदेव पवार व कोतवाल नाना उशिरे पाहाणी करीत असताना त्यांना सवंदगाव गट नंबर 1 येथे सुमारे तीनशे ते साडेतीनशे ब्रास माती काढून सपाटीकरण केलेले आढळले. महसूल विभागाने तहसीलदार चंद्रजित राजपूत यांच्या आदेशानुसार चौकशी केली असता, या जमिनीतील काही क्षेत्र पाटबंधारे विभाग, तर उर्वरित क्षेत्र गोरख शेवाळे, सूर्यभान शेवाळे, मच्छिंद्र शेवाळे व समाधान शेवाळे यांच्या नावावर असल्याचे समजले. 

हेही वाचा > रात्रीची वेळ..भयानक अंधार..शिक्षक चेकपोस्टवर ड्युटीवर असतानाच निघाला ६ फुटी कोब्रा!

तब्बल 75 ब्रास वाळू चोरी 
संबंधित क्षेत्र व परसराची 6 जुलैला नव्याने पाहाणी केली असता, शेवाळे बंधूंनी 75 ब्रास मातीमिश्रित वाळूचा साठा करून ठेवलेला आढळला. श्री. राजपूत यांच्या आदेशानुसार श्री. पवार यांनी पवारवाडी पोलिस ठाण्यात साडेचार लाख रुपये किमतीची 75 ब्रास वाळू चोरून अवैध विक्रीसाठी साठा केल्याची तक्रार दिली. पवारवाडी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarpanch's husband is the mastermind of the theft nashik malegaon marathi news