विद्यार्थ्यांनो लागा तयारीला! नाशिकमध्ये बुधवारपासून शाळांची दारे खुली

विक्रांत मते
Tuesday, 26 January 2021

शाळांमध्ये पालकांची संमती बंधनकारक आहे. सॅनिटाझर, मास्क शाळांमध्ये बंधनकारक राहणार आहे. एका विद्यार्थ्याला आठवड्यातून तीनदा वर्गांना हजर राहावे लागेल

नाशिक : कोरोना परिस्थितीत सुधारणा होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर बुधवार (ता. २७)पासून शाळांमध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार आहेत. शहरात एक लाख दहा हजार ७७३ विद्यार्थी व दोन हजार ६०२ शिक्षकांनी गजबजणाऱ्या शाळांमध्ये कोरोनासंदर्भात नियम घालून दिले असून, शाळेत प्रवेश करण्यापूर्वी दोन हजार २४९ शिक्षक, लिपिक व शिपाईपैकी बाराशे जणांची कोरोना चाचणी झाली आहे. 

लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून शाळांची दारे खुली 
सध्या नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग दिवसाआड सुरू आहेत. त्याच धर्तीवर पाचवी ते आठवीचे गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयांसाठी दिवसाआड व दोन तासांचे वर्ग भरणार आहेत. शाळांमध्ये पालकांची संमती बंधनकारक आहे. सॅनिटाझर, मास्क शाळांमध्ये बंधनकारक राहणार आहे. एका विद्यार्थ्याला आठवड्यातून तीनदा वर्गांना हजर राहावे लागेल.

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

कोरोना अहवाल सादर करण्याच्या सूचना

कोरोना चाचणीसाठी महापालिकेच्या शाळांमध्ये मुख्याध्यापक व शिक्षक मिळून २०६, तर खासगी शाळांमध्ये दोन हजार २४९ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी दिली. एकूण एक हजार २०० शिक्षक, लिपिक यांची कोरोना तपासणी झाली आहे. उर्वरित शिक्षक, लिपिकांना २९ जानेवारीपर्यंत कोरोना अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

महापालिकेच्या शाळा- १०२ 
खासगी शाळा- ३०३ 
एकूण शाळा- ४०५ 

पाचवी ते आठवीचे विद्यार्थी 
महापालिका शाळा- १५ हजार ४७६ 
खासगी शाळांचे विद्यार्थी- ९५ हजार २९७ 
एकूण- एक लाख दहा हजार ७७३ 

शिक्षकांची संख्या 
महापालिका- ४७५ 
खासगी शाळा- दोन हजार १२७ 
एकूण- दोन हजार ६०२ 

विद्यार्थ्यांना डबा नाही 
विद्यार्थ्यांना शाळेत सोडताना शक्यतो पालकांनी स्वत: यावे, डबा घेऊन येऊ नये, एकदाच विनंती अर्ज भरून द्यावा, विद्यार्थ्यांना मास्क असल्याशिवाय प्रवेश नाही, विद्यार्थ्यांना आठ दिवसांतून तीनदा वर्गात उपस्थित राहावे लागेल आदी सूचना दिल्याची माहिती शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी दिली. दरम्यान, समाजकल्याण केंद्रात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात असून, औरंगाबादला नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहेत. दोन दिवसांनी अहवाल येत असल्याने विलंब होत असल्याची माहिती देण्यात आली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: schools opening from Wednesday nashik marathi news