'पीटीसी' समोरील जागेचे होणार कागदपत्रशोध; जबाबदारी विशेष भूसंपादन अधिकाऱ्याकडे

विक्रांत मते
Wednesday, 30 September 2020

दुसरीकडे महापालिकेने या जागेवर दावा करताना कमाल जमीन धारणा कायद्यानुसार महापालिकेला जागा मोफत मिळावी, असे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्या वेळी न्यायालयाने जागामालकांना मालकी हक्क सिद्ध करण्यास सांगितले; परंतु विहित कालावधीत मालकी हक्क सिद्ध झाला नाही.

नाशिक : पोलिस अकादमीसमोरील कोट्यवधींच्या जागेसंदर्भात ठक्कर बंधूंना उच्च न्यायालयात मालकी हक्क सिद्ध करता न आल्यानंतर महापालिकेने त्या जागेवर नाव लावण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र अद्यापही हालचाल केली नव्हती. आता शासनाकडे केलेल्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून जागेच्या मूळ कागदपत्रांचा शोध घेण्यासाठी विशेष भूसंपादन अधिकारी वर्ग दोन यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे.

फाइल गहाळ झाल्याची बाब दुर्लक्षित 

या जागेसंदर्भात एक फाइल गहाळ झाल्याची बाब मात्र दुर्लक्षित करण्यात आली आहे. त्र्यंबक रोडवरील पोलिस अकादमीसमोरील सर्व्हे क्रमांक ७५०, ७५२ व ७५५ मधील जागेवर महापालिकेसाठी पाच आरक्षणे टाकण्यात आली होती; परंतु महापालिका जागा ताब्यात घेत नसल्याने आरक्षण असलेले २४ हेक्टर ६२ आर क्षेत्र परत मिळावे, यासाठी जागामालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. दुसरीकडे महापालिकेने या जागेवर दावा करताना कमाल जमीन धारणा कायद्यानुसार महापालिकेला जागा मोफत मिळावी, असे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्या वेळी न्यायालयाने जागामालकांना मालकी हक्क सिद्ध करण्यास सांगितले; परंतु विहित कालावधीत मालकी हक्क सिद्ध झाला नाही. सप्टेंबर २०१८ मध्ये न्यायालयाने ठक्कर कंपनीचा दावा नाकारला. 

विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांकडे जबाबदारी...

दावा नाकारल्यानंतर महापालिकेने त्या जागेवर नाव लावण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित होते. तसे न झाल्याने महापालिकेचे अधिकारी ती जागा दावा केलेल्या मालकांना देण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा सुरू झाली होती; परंतु २० मार्च २०२० ला महापालिकेने नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून अभिलेखात नाव लावण्याची विनंती केली होती. नगरविकास प्रधान सचिवांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र लिहून जागा मालकी ठरविण्याबाबत मार्गदर्शन मागविले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या पत्रानुसार विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविली आहे. 

हेही वाचा > मन हेलावणारी घटना! मरणही एकत्रच अनुभवण्याचा मायलेकांचा निर्णय; घटनेने परिसरात खळबळ

कोट्यवधींची जागा 

सर्व्हे क्रमांक ७५०, ७५१ व ७५५ मधील जागा मोक्यावर असून, बाजारभावानुसार जागेची किंमत बाराशे कोटींच्या आसपास आहे. उच्च न्यायालयाने जागामालकांचा दावा फेटाळल्यानंतर महापालिकेला जागा मिळणे अपेक्षित आहे. या जागेचा वाद भिजत ठेवून भविष्यात आडमार्गाने जागा ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात या जागेसंदर्भातील एक फाइल गहाळ झाली आहे. त्यामुळे जागेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर किती विश्‍वास ठेवावा, असा सूर अधिकारी वर्गात व्यक्त केला जात आहे.  

हेही वाचा > विवाहितेच्या मृत्यूनंतर माहेरच्यांकडून जावयाच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; दिंडोरी तालुक्यातील घटना

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Search for space in front of PTC Responsibility to Special Land Acquisition Officer nashik marathi news