दिलासादायक बातमी : जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्यांचा टक्का वाढतोय!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 July 2020

कोरोनामुक्‍त झालेल्‍या चारशे रुग्‍णांमध्ये ग्रामीण भागातील ७४, नाशिक शहरातील ३१५, तर मालेगाव महापालिका हद्दीतील आठ आणि अन्य जिल्ह्यांतील तीन रुग्‍णांचा समावेश आहे. दरम्यान, दिवसभरात आठ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे.

नाशिक : शहरात प्रशासनाने हाती घेतलेल्‍या 'मिशन झीरो नाशिक' मोहिमेमुळे कोरोनाबाधितांची प्राथमिक स्‍तरावर ओळख पटवत त्‍यांना उपचारप्रक्रियेत दाखल करून घेणे शक्‍य झाले आहे. अशा बाधितांपासून अन्‍य नागरिकांना लागण होण्याची प्रक्रिया टळणार आहे. दरम्‍यान, बुधवारी (ता. २२) दिवसभरात जिल्ह्यातील चारशे रुग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, नव्याने ३३० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. 

दिवसभरात चारशे रुग्‍णांची कोरोनावर मात

आमदार डॉ. राहुल आहेर यांचाही अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे. तर, आठ रुग्‍णांचा उपचार सुरू असताना मृत्‍यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या दहा हजार ४५४, तर बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या सात हजार ३७० झाली आहे. दोन हजार ६६४ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. बुधवारी दिवसभरात आढळलेल्‍या ३९० कोरोनाबाधितांमध्ये ग्रामीण भागातील ७०, नाशिक शहरातील ३०७, तर मालेगावच्‍या १३ रुग्‍णांचा समावेश आहे. 

दिवसभरात आठ रुग्‍णांचा मृत्‍यू

कोरोनामुक्‍त झालेल्‍या चारशे रुग्‍णांमध्ये ग्रामीण भागातील ७४, नाशिक शहरातील ३१५, तर मालेगाव महापालिका हद्दीतील आठ आणि अन्य जिल्ह्यांतील तीन रुग्‍णांचा समावेश आहे. दरम्यान, दिवसभरात आठ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. यापैकी पाच रुग्‍ण नाशिक शहरातील आहेत. त्यात बीडी कामगारनगर येथील ७९ वर्षीय पुरुष, आंबेडकरनगर येथील ५६ वर्षीय महिला, भद्रकाली येथील ५० वर्षीय महिला, कुंभारवाडा येथील ७५ वर्षीय पुरूष, जुन्या सिडकोच्या शिवाजी चौकातील ८२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 

एक हजारहून अधिक संशयित दाखल 

तपासणी मोहिमेतून आढळलेल्‍या संशयितांना उपचाराच्‍या प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात असल्याने संशयित रुग्‍णांची संख्या पुन्‍हा वाढली आहे. बुधवारी दिवसभरात एक हजार १३७ संशयित रुग्ण दाखल झाले. यात शहरातील ७८४, ग्रामीण भागातील १९४ आणि मालेगाव महापालिका क्षेत्रातील सहा रुग्‍ण आहेत. तसेच गृहविलगीकरणात १५३ रुग्‍ण आहेत. दरम्‍यान, प्रलंबित अहवालांची संख्या पुन्‍हा एकदा वाढली आहे. सायंकाळपर्यंत ९२३ अहवाल प्रलंबित होते. 

हेही वाचा >नाशिकला पवार साहेब आल्यानंतर सांगणार काय? कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था केविलवाणी.. तर मनसे कोमात!

आमदार डॉ. आहेर बाधित 

देवळा : चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. आहेर सातत्याने मतदारसंघात दौरे करून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. त्यादरम्यान त्यांना लागण झाली असल्याची शक्यता आहे. लक्षणे जाणवू लागताच त्यांनी तातडीने चाचणी केली. अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कळताच त्यांनी स्वतःहून विलगीकरण करून घेतले आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्यांनी संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा >नाशिकला पवार साहेब आल्यानंतर सांगणार काय? कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था केविलवाणी.. तर मनसे कोमात!

(संपादन - किशोरी वाघ)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For the second day in a row in the district The number of cured patients is high nashik marathi news