चोरांची झाली गफलत! कांदा बियाणे समजून लांबविले मेथी बियाणे

अजित देसाई 
Monday, 21 September 2020

सध्या उन्हाळ कांद्याच्या बियाणाची सर्वत्र चणचण असल्याच्या पार्श्वभूमीवर कांद्या बियाणे चोरीच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना तालुक्यातील पांगरी येथील कृषी सेवा केंद्रात घडली अज्ञात चोरट्यांनी कृषी केंद्राचे कुलूप तोडले मात्र चोरीच्या दरम्यान त्यांची वेगळीच गफलत झाल्याचे समोर आले.

नाशिक/सिन्नर :  सध्या उन्हाळ कांद्याच्या बियाणाची सर्वत्र चणचण असल्याच्या पार्श्वभूमीवर कांद्या बियाणे चोरीच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना तालुक्यातील पांगरी येथील कृषी सेवा केंद्रात घडली अज्ञात चोरट्यांनी कृषी केंद्राचे कुलूप तोडले मात्र चोरीच्या दरम्यान त्यांची वेगळीच गफलत झाल्याचे समोर आले.

शटरचे कुलूप तोडून चोरी

पांगरी येथे बस थांब्याजवळ संदीप उत्तम पगार यांचे साई कृपा कृषी सेवा केंद्र आहे. आज दि.21 मध्यरात्री 2.45 वाजेच्या सुमारास अज्ञात चार चाकी वाहनातून आलेल्या चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून औषधे, बियाणे असलेल्या रॅकची उचकपचक केली. यावेळी मेथी बियाणे कट्टे, मका बियाणे, स्वीट कॉर्न व काही तन नाशकांच्या पुड्या आणि गल्ल्यातील सुमारे पाच हजार रुपयांची रक्कम घेऊन चोरट्यांनी पळ काढला. सकाळी दूध संकलन केंद्राकडे येणाऱ्या शेतकऱ्यांना दुकान अर्धवट उघडे दिसल्यावर चोरीचा हा प्रकार लक्षात आला.

हेही वाचा - VIDEO : "मराठा आरक्षणाला विरोध करणारी राज्यातील मंत्र्यांची लॉबी सक्रीय" - आमदार विनायक मेटे

कांदा बियाण्याची टंचाई

सध्या कांदा बियाण्यांचे दर प्रचंड वाढले असून त्याची टंचाई निर्माण झाली आहे. तीन हजार रुपये किलो किंवा पंधरा हजार रुपये पायली इतका दर कांदा बियाण्याचा आहे. शेतकऱ्यांकडे घरगुती बियाणे नाही, अतिपावसामुळे यापूर्वी टाकलेल्या बियाण्याची पुरती नासाडी झाली असल्याने नव्याने रोप बनवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. आज चोरीची घटना घडलेल्या दुकानात कांदा बियाणे विक्रीसाठी येणार असल्याची चर्चा होती.

मेथी बियाणे घेऊन गले

प्रत्यक्षात मात्र हे कांदा बियाणे दुकानात आलेलेच नव्हते. तरीदेखील कांदा बियाणे मिळवण्यासाठी ही चोरी करण्यात आली असावी. परंतु कांदा बियाणे समजून चोरट्यांनी अंधारात मेथी बियाणे असलेले कट्टे उचलून नेल्याचे बोलले जात आहे. सदर घटनेची माहिती वावी पोलिसांत देण्यात आली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप शिंदे तपास करीत आहेत. 

हेही वाचा - वरुणराजाच्या हजेरीची शंभरी पार! नाशिक- पूर्व पट्ट्याला अतिवृष्टीचा दणका

 

संपादन- रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seeds stolen from krishi seva kendra nashik marathi news