लासलगावचे ज्येष्ठ नागरिक भवन राज्यासाठी आदर्श - छगन भुजबळ

अरुण खंगाळ
Sunday, 6 December 2020

दीर्घायू ज्येष्ठ नागरिक संस्था आणि राज्य शासनाच्या सहकार्याने साकारण्यात आलेले ज्येष्ठ नागरिक भवन हे राज्यातील एक आदर्श उदाहरण असून, जिल्हाभरात आवश्यक त्याठिकाणी असे ज्येष्ठ नागरिक भवन निर्माण करण्यात येईल, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

लासलगाव (नाशिक) : दीर्घायू ज्येष्ठ नागरिक संस्था आणि राज्य शासनाच्या सहकार्याने साकारण्यात आलेले ज्येष्ठ नागरिक भवन हे राज्यातील एक आदर्श उदाहरण असून, जिल्हाभरात आवश्यक त्याठिकाणी असे ज्येष्ठ नागरिक भवन निर्माण करण्यात येईल, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

शनिवारी (ता. ५) लासलगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते पार पडले, त्या वेळी ते बोलत होते. 

पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवला जाणार

भुजबळ म्हणाले, की राज्यात गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली. त्यानंतर विकासकामांना सुरवात केली. मात्र लगेचच कोरोनाचं संकट ओढवलं गेले. अशा वेळी नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाच्या वतीने प्राधान्य देण्यात आले. राज्य शासनाने हळूहळू विकासकामांना निधी देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे आता नक्की विकासकामे सुरू होतील. अधिकारी वर्गानेही मंजूर झालेल्या निधीची कामे तत्काळ पूर्ण करावीत. यांसह लासलगाव येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाकडे असून, सहा महिन्यांत हा पूल व रस्ता नागरिकांना वापरण्यासाठी खुला करण्यात येईल. लासलगाव परिसरातील पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल, असेही भुजबळ म्हणाले. 

हेही वाचा>> उच्चशिक्षित दिव्यांग रामेश्वरचा संघर्ष! रेल्वे बंदमुळे फरफट; प्रशासकीय सेवेत अधिकारी बनायचे स्वप्न 

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, कुसुम होळकर, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड, उपअभियंता श्री. ढिकले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश पाटील, लासलगाव ग्रामपंचायत प्रशासक सोनवणे यांसह पदाधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जयदत्त होळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. डाॅ. विकास चांदर यांनी आभार मानले.

हेही वाचा >> एकुलत्या एक लेकाची जेव्हा निघाली अंत्ययात्रा; मटाणे गावावर शोककळा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior Citizens Bhavan at Lasalgaon is ideal for the state says bhujbal nashik marathi news