'ट्रक रस्त्यावर कसे धावणार?'...सुरक्षेपासून टोलपर्यंतचे मालवाहतुकीपुढे गंभीर प्रश्‍न!

toll gate.png
toll gate.png
Updated on

नाशिक : ट्रक, मालवाहतूक आंतरराज्य, राज्यांतर्गत सुरळीत करण्यासाठी गृहमंत्रालयाने शिथिलता आणली आहे. अशातच, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे रविवारी (ता. 19) मध्यरात्रीपासून टोलवसुलीच्या सूचना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिल्या आहेत. त्यामुळे एकूण "ऑपरेशन कॉस्ट'च्या 20 टक्के टोल आर्थिक अडचणीच्या काळात देण्याबरोबर चालकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर आहे, अशा शब्दांमध्ये ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेसतर्फे चिंता व्यक्त करण्यात आली. मालवाहतूक करण्यातील अडथळ्यांची मालिका जटिल असल्याने ट्रक रस्त्यावर कसे धावणार, असा प्रश्‍न ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष बल मलकित सिंग यांनी उपस्थित केला आहे. 

ट्रकसमवेत असलेल्या चालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण 

ते म्हणाले, की वाहतूक क्षेत्रासाठी 20 कोटी लोक जोडले गेले आहेत. 35 हजार कोटींच्या मालासह साडेतीन लाख ट्रक अद्याप जागेवर उपलब्ध आहेत. देशात पाच टक्के ट्रक वाहतूक सुरू आहे. 90 लाख ट्रक जागेवर उभे आहेत. ट्रक सोडून गावाकडे गेलेल्या चालकांना आणण्यासाठीची व्यवस्था उपलब्ध नाही. तसेच ट्रकसमवेत असलेल्या चालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यांच्यातील ही भीती संपुष्टात आणायची असल्यास "पॅरामेडिकल' मनुष्यबळाच्या धर्तीवर प्रत्येक चालकाचा 50 लाखांचा विमा उतरवावा लागणार आहे. त्याबद्दलची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक सचिवांकडे करूनही सरकारकडून प्रतिसाद मिळत नाही. त्याचबरोबर कोरोनाचे संकट दूर होऊन सामान्य परिस्थिती तयार होईपर्यंत टोलची आकारणी करून नुकसानीतील भुर्दंड वाढविण्याचे कारण नाही. त्यामुळे मालवाहतूक सुरळीत होण्यासाठी सरकारला ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेसतर्फे करण्यात आलेल्या मागण्यांचा विचार करावा लागेल, अन्यथा सरकारला अपेक्षित असलेली मालवाहतूक सुरळीत कितपत होईल याबद्दलची साशंकता आहे. 

काही प्रश्‍न अनुत्तरित 

कोरोना विषाणूचा संसर्ग फैलाव वाढू नये म्हणून काही करण्यात आलेल्या सूचनांवर सरकार गंभीर नाही. त्यामुळे प्रश्‍न अनुत्तरित आहेत. दोनशे किलोमीटरवर ट्रकच्या सॅनिटायझेशनची व्यवस्था करावी लागणार आहे. त्याच वेळी चालकाची थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था होणे आवश्‍यक आहे. त्यामध्ये चालकावर उपचाराची आवश्‍यकता भासल्यास ते केले जावेत. पण त्याचा अजूनही विचार झालेला नाही. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाने लाल, नारंगी, हिरवा असे विभाग केले आहेत. त्याचा संबंध आरोग्याच्या उपाययोजनांसाठी असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट केले असले, तरीही लाल भागात शिथिलता करण्यात आलेली नाही. त्यामुळे या विभागाच्या कार्यपद्धतीत वाहतूक कशी करायची? हिरव्या विभागातून माल नेत असताना लाल विभागात माल खाली केला नाही तर ट्रक उभा करून ठेवायचा काय, असे अनेक प्रश्‍न अनुत्तरित असल्याचे श्री. सिंह यांनी म्हटले आहे. 

देशातील 24 हजार 997 किलोमीटर अंतरावर 2018-19 मध्ये 24 हजार 396 कोटींचा टोल आकारला गेला. त्यावरून टोलमधून सूट देणे ही ट्रक वाहतुकीसाठी मदत होऊ शकते हे स्पष्ट होते. तसेच मालवाहतुकीसाठीच्या कल्याणकारी सोयीसाठी सरकारने 200 कोटी खर्च करायला हरकत असण्याचे कारण नाही. - बल मलकित सिंग, माजी अध्यक्ष, ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com