नाशिक महासभेत गदारोळ! शिवसेना- भाजप नगरसेवक एकमेकांना भिडले; पाहा VIDEO

nashik assembly.jpg
nashik assembly.jpg

नाशिक : आज (ता.१९) नाशिक येथील महासभेत जंगी राडा पाहायला मिळाला. निमित्त होते दूषित पाणीप्रश्न.. यावेळी शिवसेना आणि भाजप नगरसेवक एकमेकांना भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं

शिवसेना नगरसेवक आक्रमक

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकरोड विभागात होत असलेला दुर्गंधीयुक्त व दुषित पाणीपुरवठ्यावरून महासभेत जोरदार राडा झाला. शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात धाव घेत प्रशासन व सत्ताधारी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दत्तक बापाने दिले काय असा सवाल भाजपच्या जिव्हारी लागल्याने भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आल्याने त्यातून वाद विकोपाला जावून राजदंड पळविण्याचा प्रयत्न झाला. राड्यामुळे महासभा काही काळासाठी तहकुब करण्यात आली. 
महापौर कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली महापालिकेची ऑनलाईन महासभा मंगळवारी चांगलीच गाजली.

सभागृहात प्रचंड आकांडतांडव

सभागृहाचे कामकाज सुरू होताच नाशिकरोड विभागातील शिवसेनेच्या नगरसेवकांनी या विभागात होणाऱ्या दुषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडताना दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आक्रमक मागणी केली. मात्र महापौरांनी महासभेच्या पटलावरील विषय चर्चेला घेतल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी महापौर महासभेचे संचलन करीत असलेल्या स्थायी समितीच्या सभागृहात धाव घेत प्रचंड आकांडतांडव सुरू केला. नाशिकरोडचा पाणीप्रश्न सुटणार कधी, नाशिकरोड विषयी सत्तारूढ भाजपला इतकी अनास्था का? अशी प्रश्नांची सरबत्ती करत सत्यभामा गाडेकर, सूर्यकांत लवटे, प्रशांत दिवे, रमेश धोंगडे, जयश्री खर्जुल आदी सेना नगरसेवकांनी महापौरांना जाब विचारला. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसनेचे गटनेते विलास शिंदे, यांच्यासह अन्य नगरसेवकही महापौरांच्या दालनात दाखल झाल्यानंतर दिवे, लवटे, धोंडगे, खर्जुल यांनी महापौरांच्या पीठासनासमोर ठिय्या मांडत घोषणाबाजी सुरू केली. केवळ प्रसिध्दीसाठी महापौरांनी चेहडी पंपीग स्टेशनची पाहणी केली.

भाजप नगरसेवकांनीही प्रतिकार केल्याने राजदंडाची खेचाखेच

पाणीप्रश्न मात्र सोडविला नाही, असा आरोप करत नाशिकला दत्तक घेवून भाजपने दिलेच काय, असा सवाल यावेळी सेना नगरसेवकांनी केल्याने महापौर कुलकर्णी, सभागृहनेते सतीश सोनवणे, भाजप गटनेते जगदीश पाटील, नगरसेवक मुकेश शहाणे आदी भाजप नगरसेवकांनी देखील सेनेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ अधिकच वाढला. यामुळे महापौर कुलकर्णी यांनी महासभा पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत असल्याचे जाहीर केले. यामुळे अधिकच संतापलेल्या सेना नगरसेवकांनी 'उत्तर द्या, उत्तर द्या महापौर उत्तर द्या', पळपुट्या सत्ताधारी पक्षाचा धिक्कार असो' अशी घोषणाबाजी सुरू केली. हा गोंधळ सुरू असतानाच महापौर गर्दीतून कसेबसे वाट काढत सभागृहाबाहेर पडले. त्यानंतर मात्र शिवसेना नगरसेवकांनी महापौरांच्या पीठासनावरील राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप नगरसेवकांनीही प्रतिकार केल्याने राजदंडाची खेचाखेच रंगली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com