ओझर ग्रामपालिका निवडणुकीवर शिवसेना, राष्ट्रवादीचा बहिष्कार; नागरिक विकास आघाडीची पुन्हा सत्ता 

Shiv Sena, NCP boycott Ojhar grampalika elections nashik marathi news
Shiv Sena, NCP boycott Ojhar grampalika elections nashik marathi news

पिंपळगाव बसवंत/ओझर : नगर परिषदेचा दर्जा कोणत्याही क्षणी बहाल होऊ शकणाऱ्या ओझर ग्रामपालिकेच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. ग्रामपंचायत कधीही बरखास्त होण्याची चिन्हे असल्याने शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्या गटाने निवडणुकीत बहिष्काराचे अस्त्र उगारले, तर राष्ट्रवादीचे राजेद्र शिंदे यांच्या गटाने वॉर्ड क्रमांक पाच वगळता निवडणुकीत काढता पाय घेतला.

शिवसेना, राष्ट्रवादीच्या बहिष्कारानंतर जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांच्या गटाने दहा जागा बिनविरोध मिळवीत ग्रामपंचायतीवर पुन्हा नागरिक विकास आघाडीचा झेंडा फडकविला आहे. सात जागांवर निवडणुकीचा संघर्ष रंगणार आहे. 

सात जागांवर निवडणुकीचा फड रंगणार

महिन्याभरापूर्वी शासनाने ओझर ग्रामपंचायत नगर परिषदेत रूपांतरित केली. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका होणार नाहीत, अशी शक्यता होती. पण प्रक्रिया पूर्ण न झाल्याने ग्रामपंचायतीचा रणसंग्राम रंगला. १७ जागांसाठी तब्बल १३५ अर्ज दाखल झाले होते. दरम्यान, नवनिर्वाचित सदस्यांचा कालावधी औटघटकेचा ठरण्याची शक्यता असल्याने माजी आमदार अनिल कदम, जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम व राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंदे या तिन्ही गटांकडून बिनविरोध निवडणूक करण्याबाबत चर्चा झाली. पण त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले नाही. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर सोमवारी दिवसभरात ११० अर्ज माघारी घेतले गेले. अखेर माजी आमदार अनिल कदम यांच्या शिवसेना समर्थकांनी निवडणूकप्रक्रियेवर बहिष्कार टाकला. राष्ट्रवादीनेही वॉर्ड क्रमांक पाच वगळता माघारी घेतल्या. त्यामुळे दहा जागा पटकावून यतीन कदम यांच्या हाती पुन्हा एकदा ओझरच्या ग्रामपंचायतीची सत्ता आली आहे. सात जागांवर निवडणुकीचा फड रंगणार आहे. 

निवडून आलेले सदस्य : 

वॉर्ड एक- सचिन आढाव, मोनाली शेजवळ, चंदा गवळी. वॉर्ड दोन- रूपाली भडके, रूपाली शेळके. वॉर्ड तीन- नरेंद्र गायकवाड, अत्तार इक्बाल. वॉर्ड चार- योगेश आहिरे, मनीषा वलवे. वॉर्ड सहा- प्रमिला रास्कर. 

ओझरला नगर परिषदेचा दर्जा मिळणे येत्या दोन महिन्यांत अटळ आहे. प्रसंगानुरूप राजकीय परिपक्वता दाखवावी लागते. अल्प कालावधीसाठी हा संघर्ष टाळला. ओझर नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा लवकरच डौलाने फडकताना दिसेल. 
-अनिल कदम, माजी आमदार, निफाड 


गेल्या पाच वर्षांत ओझरच्या नागरिकांना पायाभूत सुविधा देताना विकासकामे केली. त्यातून जनाधार नागरिक आघाडीला मिळत होता. त्यामुळे विरोधकांनी गुडघे टेकले. जनतेचा विश्‍वास सार्थ ठरवू. 
-यतीन कदम, सदस्य, जिल्हा परिषद 


दोन महिन्यांत नगर परिषद येऊ घातली आहे. जनता, कार्यकर्त्यांना वेठीस धरायचे नाही, या हेतूने तूर्त माघारी घेतली. पण राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आगामी निवडणुकीत दाखवून देऊ. 
-राजेंद्र शिंदे, माजी सरपंच, ओझर  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com