बाजार समिती संचालकपदाचा शिवाजी चुंभळेंकडून राजीनामा; सभापती पिंगळेंवर भ्रष्टाचार व मनमानीचा आरोप  

प्रमोद दंडगव्हाळ
Tuesday, 20 October 2020

सभापती देवीदास पिंगळे यांनी मागील २५ वर्षांत कृषी उत्पन्न बाजार समितीत कोट्यवधींचा घोटाळा केला असून, सव्वाशे एकर जमीन कवडीमोल भावात विकली आहे. कर्मचाऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचा प्रकार त्यांनी केला आहे.

नाशिक / सिडको : सभापती देवीदास पिंगळे यांनी मागील २५ वर्षांत कृषी उत्पन्न बाजार समितीत कोट्यवधींचा घोटाळा केला असून, सव्वाशे एकर जमीन कवडीमोल भावात विकली आहे. कर्मचाऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचा प्रकार त्यांनी केला आहे. त्यांच्या या जाचाला कंटाळून आपण राजीनामा देत आहोत, असा आरोप संचालक व माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी सोमवारी (ता. १९) पत्रकार परिषेदत केला. 

बाजार समिती संचालकपदाचा शिवाजी चुंभळेंकडून राजीनामा
चुंभळे म्हणाले, की नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी, व्यापारी व कर्मचार्यांना न्याय देऊ शकत नाही. बाजार समितीचे सभापती असताना अडीच वर्षांच्या कालावधीत तोट्यात असलेल्या बाजार समितीला नफ्यात आणले. कोट्यवधींच्या ठेवी मिळवून देणारा मी पहिला सभापती होतो. सध्याचे विद्यमान संचालक त्यांच्या बहुमताचा फायदा घेऊन मनमानी कारभार करत आहेत. त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना माझा विरोध असल्याने सभेत मी एकटा विरोधक आहे. त्यामुळे माझे म्हणणे ऐकून घेतले जात नव्हते. मला बोलण्याची संधी देत नव्हते. संचालक मंडळ सभेत विरोधी मत प्रदर्शित केल्यास त्याची दखल इतिवृत्तात दखल घेतली जात नव्हती. त्यांच्या बेकादेशीर कामांना तसेच त्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविल्यास पोलिसांत खोटे तक्रारी देऊन माझ्या विरोधात गुन्हे दाखल करत होते. तसेच माझ्यावर दडपण आणत होते. माझा जोडीदार फोडून सत्ता स्थापन केली आहे. ज्यांना सहीचा अधिकार नाही, त्या विद्यमान सभापतींनी २७ लाखांची महागडी कार खरेदी केलीच कशी, असा सवाल श्री. चुंभळे यांनी केला. 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

 

सभापती पिंगळेंवर भ्रष्टाचार, मनमानीचा आरोप 
संबंधित संचालकाने सहकारी संचालकास शिवीगाळ, दमबाजी करत जबर मारहाण केली होती. त्या प्रकरणी बाजार समिती कायदा कलम १७ नुसार संचालक पद रद्द करण्यात आले होते. जिल्हा उपनिबंधकांकडे यावर सुनावणी सुरू आहे. सुनावणीत निकाल विरुद्ध लागतो की काय, या भीतीनेच संबंधित संचालकाने राजीनामा दिला असावा. - देवीदास पिंगळे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक

 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivaji Chumbhale resigns as Market Committee Director nashik marathi news