शिवसेनेचे नगरसेवक आज मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; 'या' विषयांवर होणार चर्चा

विक्रांत मते
Saturday, 16 January 2021

चार वर्षांत सत्ताधारी भाजपकडून झालेल्या चुका प्रकर्षणाने मतदारासंमोर मांडणे, राज्यातील सत्तेच्या माध्यमातून महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबरोबरच रिक्त पदे भरणे, महापालिकेसाठी निधी देणे आदी विषयांवर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

नाशिक : पुढील वर्षाच्या सुरवातीला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून, या पार्श्‍वभूमीवर निवडणुकीची रणनीती आखण्याबरोबरच चार वर्षांत नगरसेवकांनी केलेली कामे, भविष्यातील प्रस्तावित कामे व कुठल्या मुद्यावर निवडणूक लढवायची, याविषयांवर शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची बैठक शनिवारी (ता. १६) दुपारी चारला होणार आहे. 

वर्षा निवासस्थानी महापालिका निवडणुकीची खलबते 

२०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत संधी असूनही शिवसेनेला नाशिककरांनी सत्तेपासून दूर ठेवले. भारतीय जनता पक्षाला बहुमत देताना निम्मे नगरसेवक शिवसेनेचे निवडून प्रबळ विरोधी पक्ष दिला होता. शिवसेनेला संधी असूनही सत्ता न मिळाल्याने अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले होते. त्याचवेळी निवडणुकीतील चुका शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. गेल्या चार वर्षांत निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता, वर्षभरापूर्वीच निवडणुकीची तयारी करण्याचे नियोजन केले आहे. 

शिवसेनेला मतदारांसमोर आणण्याच्या दृष्टीने तयारी

एकीकडे भाजपकडून विकासकामांचे नारळ फोडण्याची तयारी होत आहे, तर दुसरीकडे भाजपच्या कामांचा पर्दाफाश करण्याबरोबरच आगामी निवडणुकीत सक्षम पक्ष म्हणून शिवसेनेला मतदारांसमोर आणण्याच्या दृष्टीने तयारी केली जात आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने व शिवसेना त्यात प्रमुख घटक असल्याने त्याचा लाभ मतदानाच्या रूपाने पदरात पाडून घेण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे बैठक होत आहे. खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, गटनेता विलास शिंदे, वसंत गिते, सुनील बागूल, दत्ता गायकवाड, सत्यभामा गाडेकर आदींसह नगरसेवक बैठकीत सहभागी होतील. 

याविषयांवर होणार चर्चा 

२०१९ मध्ये शासनाने एकसदस्यीय प्रभाग रचनेचा कायदा केला असला, तरी ५० टक्के महिला आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर द्विसदस्यीय प्रभाग रचनेचा नगरसेवकांचा आग्रह आहे. बैठकीत याविषयावर चर्चा होईल. चार वर्षांत सत्ताधारी भाजपकडून झालेल्या चुका प्रकर्षणाने मतदारासंमोर मांडणे, राज्यातील सत्तेच्या माध्यमातून महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबरोबरच रिक्त पदे भरणे, महापालिकेसाठी निधी देणे आदी विषयांवर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

हेही वाचा >   लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?

खासदार संजय राऊत यांच्याकडे नाशिकमधील प्रश्‍नासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठक व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार ही बैठक होत आहे. - अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते, महापालिका  

हेही वाचा >  देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ShivSena corporators from Nashik will meet Chief Minister today nashik marathi news