दहा वर्षांपासून शिवसेनेचा एकच नगरसेवक! आगामी महापालिकेत पंचवटीत शिवसेनेचे बळ वाढणार?

 shivsena 123.jpg
shivsena 123.jpg

पंचवटी (नाशिक) : नाशिक रोड, सिडकोसह सातपूरसारख्या कामगार वसाहतीत शिवसेनेने चांगलेच हातपाय पसरलेले आहेत; परंतु मागील दहा वर्षांपासून शिवसेनेचा पंचवटी विभागात केवळ एकच नगरसेवक निवडून आला आहे. मात्र, मध्यंतरी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने पुढील वर्षीच्या सुरवातीला होणाऱ्या महापालिका निवडणुकीत या पक्षाचे पंचवटी विभागात बळ वाढण्याची शक्यता आहे. 

आगामी महापालिकेत पंचवटीत शिवसेनेचे बळ वाढणार?  
२०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शहराच्या इतर भागांप्रमाणेच पंचवटी विभागातही मनसेचे नगरसेवक मोठ्या प्रमाणावर निवडून आले होते. तेव्हा शिवसेनेच्या पारड्यात केवळ मनीषा हेकरे यांच्या रूपाने एकमेव दान पडले होते, तर त्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या पंचवार्षिकमध्ये शिवसेनेच्या पूनम मोगरे याच विजयी झाल्या होत्या. 


ताकद वाढविण्याचे आव्हान 
आगामी महापालिका निवडणुकीत महापौर शिवसेनेचाच अशी घोषणा मध्यंतरी खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यातच पंचवटीतील प्रबळ नेते सुनील बागूल यांनी भाजपमधून पुन्हा स्वगृही म्हणजे शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर श्री. बागूल यांच्यावर पंचवटीतील पक्षाचे बळ वाढविण्याचे प्रमुख आव्हान असणार आहे. त्यामुळे श्री. बागूल यांच्या प्रवेशानंतर पंचवटी विभागात शिवसेनेचे किती उमेदवार निवडून येतील, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. 


सानप यांची घरवापसी 
गेल्या महापालिका निवडणुकीवेळी माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे शहराध्यपदाचीही जबाबदार होती. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच भाजपचे ६६ नगरसेवक निवडून आल्याने भाजपला सत्तेपर्यंत पोचविणे सोपे गेले. त्यात पंचवटीतील सहा प्रभागांतून तब्बल १९ नगरसेवक निवडून आले होते. आता श्री. सानप यांचीही भाजपत घरवापसी झाली असून, ते पंचवटीतील पक्षाचे वर्चस्व कितपत टिकवून ठेवतात, हेही महत्त्वाचे ठरेल. 
--- 
ग्रामीण भागात शिवसेना वरचढ 
महापालिकेच्या स्थापनेवेळी शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील २३ खेड्यांचा समावेश महापालिका हद्दीत करण्यात आला. त्यात पंचवटी विभागातील आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद, नांदूर, मानूर, दसक, पंचक आदी ग्रामीण भागाचाही समावेश आहे. या भागात शिवसेनेचे काम असल्याचे शिवसैनिक सांगतात. आगामी महापालिका निवडणुकीत मतांमध्ये परिवर्तन करण्याची अवघड जबाबदारी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर आहे. 

केवळ सहा महिन्यांसाठी पोटनिवडणूक 
पंचवटीतील प्रभाग चारच्या भाजप नगरसेविका शांता हिरे यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. आता या प्रभागात पोटनिवडणुकीसाठी तयारी सुरू झाली असून, विभागीय कार्यालयात मतदारयादीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, पुढील वर्षीच्या सुरवातीलाच महापालिकेच्या पंचवार्षिकसाठी निवडणूक होत असल्याने अवघ्या सहा आठ महिन्यांसाठी नगरसेवक होण्यास, त्यासाठी निवडणुकीचा खर्च करण्यास फारसे कोणी इच्छुक नाहीत, असे चित्र आहे. 


एकूण जागा- २४ 
रिक्त जागा- ०१ 
भाजप - १८ 
मनसे - ०२ 
अपक्ष - ०२ 
शिवसेना - ०१  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com