निशब्द! अकरा दिवसांच्या बाळाला उराशी धरून सैनिकपत्नीने फोडला हंबरडा; आक्रोश आणि हळहळ

अंबादास देवरे
Wednesday, 25 November 2020

अकरा दिवसांच्या बाळाला उराशी धरून हंबरडा फोडून रडणाऱ्या त्यांच्या पत्नी नीलम यांच्या आक्रोशाने उपस्थितांच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. सारे गाव हळहळले.

सटाणा (जि.नाशिक) : मृत जवान कुलदीप यांच्या अकरा दिवसांच्या बाळाला उराशी धरून हंबरडा फोडून रडणाऱ्या त्यांच्या पत्नी नीलम यांच्या आक्रोशाने उपस्थितांच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पिंगळवाडे (ता. बागलाण) येथील जवान कुलदीप जाधव यांच्यावर मंगळवारी (ता. २४) लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंचक्रोशीतील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कुलदीप जाधव यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

‘अमर रहे, अमर रहे, कुलदीप जाधव अमर रहे..
शनिवारी (ता. २१) जम्मू-काश्‍मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये झोपेतच जवान कुलदीप जाधव यांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी सकाळी नऊला मृत कुलदीप यांचे पार्थिव सटाणा शहरात दाखल होताच शहरातून जाणाऱ्या विंचूर-प्रकाशा राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा कुलदीप यांच्या निवासस्थानापर्यंत अंत्यदर्शनासाठी शहरवासीयांनी मोठी गर्दी केली. या वेळी चारफाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून थेट ताहाराबाद रस्त्यामार्गे भाक्षी रोड येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव फुलांनी सजविलेल्या वाहनातून नेण्यात आले. या वेळी चौकाचौकांत शवपेटी थांबवून पार्थिवावर पक्ष, संघटना आदींनी पुष्पवृष्टी करून अभिवादन केले. या वेळी ‘अमर रहे, अमर रहे, कुलदीप जाधव अमर रहे...भारत माता की जय’च्या घोषणांनी शहर व परिसर दुमदुमून गेला. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

पुष्पचक्र अर्पण करून कुलदीप यांना मानवंदना

खासदार व माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार दिलीप बोरसे, मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, उपविभागीय अधिकारी विजय भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे (पाटील) यांनी कुलदीप यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. सैन्यदलातील नायब सुभेदार परवेझ शेख यांनी सैन्यदलातर्फे पुष्पचक्र अर्पण करून कुलदीप यांना मानवंदना दिली. केंद्र सरकारकडून कुलदीप जाधव यांच्या कुटुंबीयांना पन्नास लाख रुपयांची मदत मिळवून देणार असल्याची घोषणा खासदार डॉ. भामरे यांनी या वेळी केली. यापुढे जाधव कुटुंबीयांना कायमस्वरूपी मोफत वैद्यकीय सुविधा पुरविणार असल्याचे डॉ. तुषार शेवाळे यांनी जाहीर केले. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Funeral of soldier Kuldeep jadhav satana nashik marathi news