ह्रदयद्रावक! शांत वाखारीचे ‘समाधान’ हिरावले; संपूर्ण कुटुंबावर एकाच वेळी अंत्यसंस्काराने हेलावली मने

संजीव निकम
Saturday, 8 August 2020

तो  नावाप्रमाणेच समाधानी होता, कुणाच्याही अध्यात- मध्यात नसल्याने सर्वांशी सलोख्याचे संबंध असलेल्या समाधान चव्हाणच्या चौकोनी कुटुंबाची  हत्या झाल्याच्या धक्क्यातून वाखारी गाव अजूनही सावरू शकलेले नाही. या हत्याकांडामुळे ग्रामस्थ भयभीत  झाले आहेत. एरवी शेतात, वस्तीवर   सुखनैव  राहणाऱ्या  ग्रामस्थांच्या मनात या हत्याकांडाने हुरहूर निर्माण केली आहे. 

नाशिक / नांदगाव : तो  नावाप्रमाणेच समाधानी होता, कुणाच्याही अध्यात- मध्यात नसल्याने सर्वांशी सलोख्याचे संबंध असलेल्या समाधान चव्हाणच्या चौकोनी कुटुंबाची  हत्या झाल्याच्या धक्क्यातून वाखारी गाव अजूनही सावरू शकलेले नाही. या हत्याकांडामुळे ग्रामस्थ भयभीत  झाले आहेत. एरवी शेतात, वस्तीवर   सुखनैव  राहणाऱ्या  ग्रामस्थांच्या मनात या हत्याकांडाने हुरहूर निर्माण केली आहे

संपूर्ण कुटुंबावर एकाच वेळी अंत्यसंस्काराने हेलावली मने 
निरपराध कुटुंबाची  अशी शोकांतिका झाल्याने त्यांच्या मनात संतापाचीही भावना उचंबळून आली अन्‌ गावातील मंडळी  पिक-अप करून थेट मालेगावला जेथे शवविच्छेदन सुरू होते त्या ठिकाणी धावली. आरोपींचा शोध घेतला जात नाही, तोवर आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका सरपंच संजय चव्हाण यांच्यासह अनेकांनी घेतली. कृषिमंत्री दादा भुसे आले, त्यांनी समजूत काढली व अंत्यविधीच्या मार्गातील कटुता अशा रीतीने टळली . सायंकाळी उशिरा या मृतदेहांवर शोकाकुल  वातावरणात अंत्यसंस्कार झाले. 

हेही वाचा >नांदगाव हादरले...एकाच कुटुंबातील सर्वांची निघृण हत्या; मोठी खळबळ

शांत गावाचे समाधान असे हिरावले

एकाच वेळी अशा पद्धतीने संपूर्ण कुटुंबावर अंत्यविधीचा हा गावातील पहिलाच प्रसंग. त्यातच, गेल्या पाच वर्षांत पोलिस ठाण्याची साधी पायरीही  न चढणारे हे  गाव. त्यामुळे वाखारीची तशी ओळख राजकीयदृष्ट्या अतिशय जागरूक. मात्र, कमालीची कष्टकरी माणसे या गावात राहतात. त्यातीलच समाधान हादेखील. एक  भाऊ लष्करात आहे. घरची परिस्थिती बिकटच.  समाधान वाखारीहून नांदगावला तीनचाकी रिक्षाने प्रवासी वाहतूक करायचा. घरी वृद्ध आई-वडील, दोन भाऊ व स्वतःचे चौकोनी कुटुंब. लष्करात असलेल्या भावाच्या शेतातली कामे करणे, जोडीला रिक्षाचा व्यवसाय. मात्र, सध्या लॉकडाउनमुळे  रिक्षाही बंद पडलेली. त्यामुळे मालवाहू  रिक्षा चालवून उदरनिर्वाह करीत असे. जेऊर  गावालगत वस्तीवर तो राहत असे. अशा सर्वसाधारण कुटुंबातील चौघांचे कलेवर बघावयास मिळाल्याने गाव हादरले. अनेकांना धक्का बसला. समाधानचे आई-वडील वऱ्हाळे-शिरसोंडीला लेकीकडे गेलेले होते. त्यांना या धक्क्यातून सावरता येत नव्हते. त्यांच्या आक्रोशाने उपस्थितही हेलावून गेले. जे घडले ते अघटितच होते. शांत गावाचे समाधान असे हिरावले गेले .  

हेही वाचा : दुर्दैवी! खर्च करूनही हाती काहीच नाही; विवंचनेने ग्रासलेल्या शेतकऱ्याची अखेर हिम्मत सुटलीच

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: side story of nandgaon murder nashik marathi news