सिन्नरला अतिरिक्त भारनियमनातून शेतकऱ्यांची सुटका; आमदार कोकाटेंच्या प्रयत्नांना यश

kokate.jpg
kokate.jpg

नाशिक : (सिन्नर) तालुक्याच्या पूर्व भागातील चार वीज उपकेंद्रांवरील १३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची साडेतीन वर्षांनंतर अतिरिक्त भारनियमनातून मुक्तता झाली आहे. अतिरिक्त ओव्हरहेड वाहिनी उभारण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी ७८ लाख रुपये निधी मंजूर करून आणत हे काम मार्गी लावल्याने आता चार उपकेंद्रांना पुरेशा क्षमतेने वीजपुरवठा होऊ लागला आहे. जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते मुसळगाव येथील वीज केंद्रात कळ दाबून या वाहिन्या प्रवाहित करण्यात आल्या. 

आमदार कोकाटेंच्या प्रयत्नातून ओव्हरहेड वाहिनी कार्यान्वित 

तालुक्यातील शहा, देवपूर, वडांगळी, सोमठाणे व निमगाव सिन्नर असे पाच वीज उपकेंद्र मुसळगाव वीज केंद्रातून एकाच उच्चदाब वाहिनीने जोडली होती. नंतर निमगाव सिन्नर दुसऱ्या वाहिनीला जोडण्यात आले. तरीही उर्वरित चार उपकेंद्रांना ही वाहिनी पुरेशा क्षमतेने वीजपुरवठा करू शकत नव्हती. त्यामुळे गेल्या साडेतीन वर्षांपासून या वाहिनीवरील ओव्हरहेड तारा बदलविण्याची मागणी होत होती. पूर्व भागात रब्बीची पिके मोठ्या प्रमाणावर असल्याने वीज उपकेंद्रांवर मोठ्या प्रमाणावर दाब वाढत होता. परिणामी, ३३ केव्ही वीज वाहिनीच्या ओव्हरहेड तारा सातत्याने तुटायच्या व वारंवार वीजपुरवठा खंडित व्हायचा. त्यामुळे ऐन रब्बी हंगामात सिंचनाअभावी पिके करपायची. अनेकदा संतापलेल्या शेतकऱ्यांच्या रोषाला वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागत होते. 

४० गावे अन् १३ हजार शेतकऱ्यांना फायदा 

आठ महिन्यांपूर्वी आमदार कोकाटे यांनी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता दारोली, कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे व उपअभियंता खैरनार यांच्याशी बैठक घेऊन यावर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, याच बैठकीत अधिकाऱ्यांनी साडेतीन वर्षांपूर्वी प्रस्ताव बनवला असून, त्याला निधी न मिळाल्याने हे काम रखडल्याचे आमदार कोकाटे यांच्या लक्षात आणून दिले. शेतकरीहीत डोळ्यांसमोर ठेवत आमदार कोकाटे यांनी लक्षात घेत जिल्हा वार्षिक योजनेतून या कामासाठी ७८ लाख रुपये निधी मंजूर करून आणत हे काम मार्गी लावले. या वेळी स्टाइसचे अध्यक्ष पंडितराव लोंढे, उपकार्यकारी अभियंता ऋषिकेश खैरनार, सहाय्यक अभियंता वैभव पवार व हर्षल मांडगे, शहा येथील संभाजी जाधव, सोपान वाईकर, राजू कोकाटे आदी उपस्थित होते. 

वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबरोबरच अतिरिक्त भारनियमनातूनही देवपूर, शहा, सोमठाणे व वडांगळी या उपकेंद्रांतर्गत असणाऱ्या खडांगळी, मेंढी, चोंढी, कीर्तांगळी, कोमलवाडी, एकलहरे, निमगाव (दे.), फर्दापूर, धारणगाव, पंचाळे, धनगरवाडी, शिंदेवाडी, महाजनपूर, उजनी, दहीवाडी, रामपूर, कारवाडी, भरतपूर, लक्ष्मणपूर, सांगवी आदी ४० हून अधिक गावांतील १३ हजार शेतकऱ्यांना आता खंडित व अतिरिक्त वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागणार नाही. 

शेतकऱ्यांना साडेतीन वर्षांपासून अतिरिक्त भारनियमन व खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागत होते. आमदार माणिकराव कोकाटे यांनी ७८ लाख रुपये निधी मंजूर करून आणत हे काम मार्गी लावले. त्यामुळे रब्बी हंगामाच्या तोंडावर पूर्व भागातील सर्वांची अतिरिक्त भारनियमनातून मुक्तता झाली. - सीमंतिनी कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com