पुन्हा जुळल्या रेशीमगाठी! कोरोनाकाळात सिन्नरमध्ये ४१ संसार सुरळीत 

राजेंद्र अंकार
Saturday, 24 October 2020

संसारातील वादात पती-पत्नीत गैरसमज होऊन वाद होतात. हा वाद सोडविताना दोन्ही बाजू ऐकल्या जाऊन कुटुंबात वाद कसे टाळता येतील. त्यामुळे काय नुकसान होऊ शकते याचे योग्यरीत्या मार्गदर्शन करण्यात आले.

सिन्नर (जि.नाशिक) : कोरोनाकाळात येथील महिला समुपदेशन केंद्राने तुटण्याच्या मार्गावर असलेले ४१ संसार पुन्हा सुरळीत केले. सिन्नर पोलिस ठाण्याच्या आवारात २०१२ पासून महिला व बालविकास विभागाची मान्यता असलेले रायरेश्वर शैक्षणिक व सामाजिक संस्था, नाशिक संचालित हे महिला समुपदेशन केंद्र कार्यरत आहे.

वाद सोडविताना दोन्ही बाजू ऐकल्या

कोविड महामारीच्या काळात मार्च ते सप्टेंबर २०२० दरम्यान या समुपदेशन केंद्रात पती-पत्नीच्या वादाचे एकूण ६६ अर्ज दाखल झाले होते. त्यांपैकी ४१ अर्जांचे समुपदेशन करून त्यांचे संसार पुन्हा नव्याने सुरळीत करण्यात समुपदेशन केंद्राच्या संयोजकांना यश आले. संसारातील वादात पती-पत्नीत गैरसमज होऊन वाद होतात. हा वाद सोडविताना दोन्ही बाजू ऐकल्या जाऊन कुटुंबात वाद कसे टाळता येतील. त्यामुळे काय नुकसान होऊ शकते याचे योग्यरीत्या मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष आप्पा गायकवाड व पोलिस ठाण्याचे अधिकारी व सर्व कर्मचारी यांनी या कामी संस्थेस सहकार्य केले. पोलिस निरीक्षक साहेबराव पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. बी. रसेडे, विजय माळी यांचेही मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. या ठिकाणी समुपदेक म्हणून निवृत्ती आव्हाड व संगीता चौधरी कामकाज पाहतात. 

हेही वाचा > धक्कादायक! उपजिल्हाधिकारी दालनात युवकाने अंगावर पेट्रोल ओतले; जिल्हाधिकारी कार्यालयात धावपळ

समुपदेशन केंद्रामुळे पोलिसांवरील ताण कमी... 
बहुतेक वेळा पती-पत्नीचे कौटुंबिक वाद वाढतात. त्याला कौटुंबिक हिंसाचाराचे रूप येते मग पोलिस ठाण्याची पायरी चढली जाते. एकमेकांची उणीदुणी काढण्यात पोलिस ठाण्यात वेळ जातो. त्यामुळे पोलिसांकडून अशा तक्रारी महिला समुपदेशनाकडे वर्ग होतात. तेथे त्यांना वाद अथवा भांडण मिटविण्याची संधी दिली जाते. अनेक वेळा समुपदेशन केले जाते. २०१२ पासून स्थापन झालेल्या येथील समुपदेशन केंद्राकडून आजपर्यंत ९१२ कौटुंबिक वादाच्या तक्रारी दाखल झाल्या. त्यातील असंख्य तक्रारी सुटल्या, तर काही न्यायालयात दाखल झाल्या. 

हेही वाचा >क्षणार्धात संसाराची राखरांगोळी! चव्हाण कुटुंबियांचे ५० हजारांचे नुकसान 
 

पती-पत्नीचे वाद काही वेळेस किरकोळ स्वरूपात असतात. बहुतेक वेळा नातेवाइकांनी हस्तक्षेप केल्याने ते चिघळतात. त्याचाच धागा पकडून समुपदेशन केल्यास अनेक संसार पुन्हा जुळले आहेत. एकमेकांच्या गैरसमजातूनही संसार तुटण्याच्या मार्गावर जातो. त्या वेळी तो प्रश्न अत्यंत नाजूकपणे सोडवावा लागतो. -निवृत्ती आव्हाड, समुपदेशक सिन्नर 

 

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sinnar Women's Counseling to couple Center during Corona period nashik marathi news