भयानक! कोरोना बाधित मृतदेहासोबत नातलगांनी हे काय केले?...जीवांशी झाला खेळ

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

56 वर्षिय कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याने रुग्णालयाकडून मृतदेह प्लॅस्टिक कव्हरमधून नातलगांच्या स्वाधीन केला गेला. त्यावेळी विद्युत दाहिनीमध्ये अंत्यविधी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तरी देखील नातलगांनी त्या मृतदेहासोबत धक्कादायक प्रकार केला... ज्याचा परिणाम सर्वांना भोगावा लागत आहे.

नाशिक : पंचवटीच्या स्नेहनगर येथील 56 वर्षिय कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याने रुग्णालयाकडून मृतदेह प्लॅस्टिक कव्हरमधून नातलगांच्या स्वाधीन केला गेला. त्यावेळी विद्युत दाहिनीमध्ये अंत्यविधी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तरी देखील नातलगांनी त्या मृतदेहासोबत धक्कादायक प्रकार केला... ज्याचा परिणाम सर्वांना भोगावा लागत आहे.

असे काय घडले?

पाच दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या कोरोना संशयित रुग्णाचा रीतिरिवाजानुसार अंत्यविधी केल्याने आणखी सहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता. 5) पंचवटीत उघडकीस आला. दरम्यान, जिल्ह्यात दिवसभरात 36 रुग्णांची भर पडली असून, यात नाशिक शहरातील 21, मालेगावचे पाच आणि उर्वरित जिल्ह्यातील दहा रुग्णांचा समावेश आहे. 
पंचवटीच्या स्नेहनगर येथील 56 वर्षिय कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याने रुग्णालयाकडून मृतदेह प्लॅस्टिक कव्हरमधून नातलगांच्या स्वाधीन केला गेला. त्यावेळी विद्युत दाहिनीमध्ये अंत्यविधी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. परंतु, नातलगांनी कव्हर काढून मृतदेहास अंघोळ घातली. रीतिरिवाजानुसार अंत्यविधी करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संबंधित मृत रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या पथकाने स्नेहनगरमधील त्यांचे घर गाठले आणि कुटुंबीयांतील सदस्यांना ताब्यात घेत त्यांचे स्वॅब घेतले. या कुटुंबातील सहा जणांचे रिपोर्ट गुरुवारी (ता. 4) पॉझिटिव्ह आले. 

शहरातील रुग्णसंख्या वाढली 
शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात एकूण 36 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात पंचवटीच्या दत्तनगर येथील बाधित रुग्णाच्या कुटुंबातील 50 वर्षीय महिला, 26 वर्षीय तरुणी व 28 वर्षीय तरुण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शालिमार चौकातील संदर्भसेवा रुग्णालयातील 35 वर्षीय आरोग्यसेविकेचा अहवालही पॉझिटिव्ह असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंडित कॉलनीतील 36 वर्षीय रुग्ण हा नवीन आहे. याशिवाय, मालेगाव शहरात पुन्हा पाच रुग्ण वाढले आहेत. तर, विंचूर (ता. निफाड) येथे दोन, नांदगावमध्ये एक, आंबे दिंडोरी येथे एक आणि राहुरी (ता. नाशिक) येथे दोघांना कोरोनाची लागण झालेली आहे. रात्री उशिरा आलेल्या 16 पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये खोडेनगरमधील पाच वर्षांच्या चिमुकल्यासह सहा जण, तसेच राहुलवाडी (पंचवटी), दिंडोरी रोड, भराडवाडी, नाईकवाडीपुरा व जुने नाशिक, पखाल रोडलगत अशोकामार्ग, त्रिमूर्तीनगर (हिरावाडी), आणि विजयनगर (सिडको) येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! "निसर्गा'ने केली आई-मुलाची ताटातूट...रात्रभर बछडा आईची वाट बघत होता

लासलगाव शहर कोरोनामुक्त 
लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमधून शुक्रवारी सकाळी अकराला लासलगाव व शिलापूर येथील कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सेंटरचे प्रमुख डॉ. राजाराम शेंद्रे यांनी ही माहिती दिली. जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी अनंत पवार, निफाडचे वैद्यकीय अधीक्षक रोहन मोरे, निफाड तालुका वैद्यकीय अधिकारी चेतन काळे, निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. साहेबराव गावले उपस्थित होते. कोरोनामुक्त रुग्णांना फुलांचा वर्षाव व टाळ्यांच्या गजरात निरोप देताना 14 दिवस होम क्वारंटाइन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

हेही वाचा > "पैसे नाही दिले..तर अंगावर थुंकून कोरोनाबाधित करेन..."अजब धमकीने त्याच्या पायाखालची सरकली जमीन!

बाधित रुग्णांची संख्या आठ

विंचूर येथील सिद्धार्थनगर भागातील बाधित रुग्णाच्या कुटुंबातील 60 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिलेचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. या कुटुंबातील यापूर्वीच्या 26 वर्षीय रुग्णाचे भाजीपाला व कांदा विक्रीसाठी मुंबई येथे जाणे-येणे होते. त्याच्या संपर्कातील 45 जणांना लोरिस्क म्हणून होम क्वारंटाइन, तर कुटुंबातील पाच जणांना हायरिस्क म्हणून येथील कर्मवीर विद्यालयात क्वारंटाइन करण्यात आले होते. हायरिस्कमधील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे येथील बाधित रुग्णांची संख्या आठ झाली आहे. बाधित रुग्णांना लासलगावच्या कोविड सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. तालुका आरोग्य अधिकारी चेतन काळे व येथील वैद्यकीय अधिकारी पी. आर. जाधव यांनी ही माहिती दिली. 
 

सिन्नरमधील नऊ जणांना डिस्चार्ज 
सिन्नर  येथील ग्रामीण रुग्णालयातून शुक्रवारी कोविड संसर्गावर मात करणाऱ्या नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यात सहा वर्षांच्या एका चिमुरड्यासह 67 वर्षांच्या वृद्धासह दापूरचे पाच, फुलेनगर (वावी) येथील तीन, तर नाशिक रोड येथील एका रुग्णाचा समवेश आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका निर्मला गायकवाड यांनी ही माहिती दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six people were infected due to corona patient,s funeral nashik marathi news