नाशिक परिमंडळात २८ वाहिन्या सौरऊर्जेवर; तर कृषिपंपांना ६० मेगावॉट वीज

विनोद बेदरकर
Monday, 5 October 2020

शेतीला दिवसा आठ व रात्री दहा तास, असा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा होतो. रात्रीअपरात्री पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची होणारी अडचण टाळण्यासाठी राज्य शासनाने शेतीला दिवसा वीज देण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजना राबवण्यात येत आहे.

नाशिक : ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतून नाशिक परिमंडळात ६० मेगावॉटच्या सौर प्रकल्पातून २८ कृषी विद्युत वाहिन्यांद्वारे कृषिपंपांना आता दिवसा वीज मिळण्यास सुरवात झाली आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कार्यान्वित केलेल्या राज्यातील ५० पैकी २८ कृषी वाहिन्या नाशिक परिमंडलातील आहेत. 

शेतीला दिवसा आठ व रात्री दहा तास, असा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा होतो. रात्रीअपरात्री पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची होणारी अडचण टाळण्यासाठी राज्य शासनाने शेतीला दिवसा वीज देण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतून नाशिक जिल्ह्यात पाच ठिकाणी पाच मेगावॉटचे दोन म्हणजे एकूण दहा मेगावॉटचे, तर नगर जिल्ह्यात एक ठिकाणी पाच मेगावॉटचे दोन, असे एकूण सहा प्रकल्प उभारले. त्याची स्थापित क्षमता ६० मेगावॉट आहे. या सौर प्रकल्पातून तयार झालेली वीज महावितरण उपकेंद्रातून बाहेर पडणाऱ्या कृषी वाहिन्यांना दिवसा मिळणार आहे. सकाळी सहा ते दुपारी दोन, सकाळी दहा ते सायंकाळी सहा आणि सकाळी नऊ ते सायंकाळी पाच, या वेळेचा समावेश असेल. 

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

सौर वाहिन्या 

जिल्ह्यातील टेंभे (ता. बागलाण) उपकेंद्रातील सहा, टिंगरी (ता. मालेगाव) उपकेंद्रातील पाच, वाहेलगाव (ता. नांदगाव) उपकेंद्रातील चार, राजापूर (ता. येवला) उपकेंद्रातील चार, दहिवड (ता. देवळा) उपकेंद्रातून पाच, तर नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जवळा विद्युत उपकेंद्रातील चार कृषी वाहिन्यांचा समावेश आहे.  

 हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solar will provide electricity farmers nashik marathi news