अरेच्चा! हा तर 'सुंदरा मनामध्ये भरली'मधला विक्या; डेंटिस्ट ते अभिनयातील 'चैतन्य'मय प्रवास

रणधीर भामरे
Sunday, 27 September 2020

मध्यमवर्गीय कुटुंबाचे सर्वांत मोठे स्वप्न म्हणजे आपल्या मुलांनी खूप शिकावे व मोठ्या पदावर नोकरी करावी असेच असते. याच मानसिकतेतून जायखेडा (ता.बागलाण) येथील तरुणाने आई-वडिलांचे स्वप्न साकारण्यासाठी वैद्यकीय शाखा निवडून डेंटिस्टची पदवी घेतली. एका शिक्षकाच्या कुटुंबातून डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

नाशिक : (वीरगाव) लहानपणापासून त्याच्यात सुप्त अवस्थेत असलेल्या अभिनयाच्या गुणामुळे या तरुणाने अभिनय क्षेत्रात गाठलेल्या उंचीमुळे तालुक्यासह जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. डॉक्टर ते अभिनेता असा प्रवास करणाऱ्या या तरुणाचे नाव नाव आहे, डॉ. चैतन्य बागूल... 

अल्पावधीतच आपली वेगळी छाप 

सध्या दंतचिकित्सकपेक्षाही अभिनय चिकित्सक म्हणून ते नावारूपास येत आहेत. शिक्षक आई-वडिलांच्या संस्कारात वाढलेल्या चैत्यनच्या मनात अगदी लहानपणापासून अभिनयाच्या उकळ्या आणि पायात नृत्याच्या पाकळ्या हळूहळू उमलू लागल्या होत्या. याविषयी आई-वडिलांनाही आधीच कल्पना होती. मात्र आधी शिक्षण मग ही नाटकबाजी अशा दमवजा प्रेमळ सल्ल्यानुसार चैतन्यनेही त्याचं एक- एक पाऊल पुढे टाकत वैद्यकीय शिक्षणापर्यंत प्रामाणिकपणे वाटचाल सुरू ठेवली. मात्र जिथं-जिथं संधी मिळाली, तिथं-तिथं आपल्या दर्जेदार नृत्याने तर कधी अभ्यासपूर्ण सशक्त अभिनयाने नाशिक कलानगरीच्या सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी छाप अल्पावधीतच निर्माण केली. 

एका रात्रीत डॉ. बागूल महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात

कधी रंगमंच, तर कधी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मचा सुयोग्य वापर करत नाशिकमधील अनेक नामवंत कलाकार मंडळी व कला जोपासणाऱ्या संस्थांसोबत अनेक यू-ट्यूब पट किंवा गाण्याच्या तसेच बऱ्याच नाट्यकलाकृतीच्या माध्यमातून चैतन्यचा चेहरा हळूहळू रसिक मनाच्या पटलावर विराजमान होऊ लागला. लहानपणापासूनच टीव्हीवर येण्यासाठी इथवर केलेली ही धडपड नकळत थांबली आणि अगदी पुढ्यात एक संधी आली, ज्यामुळे एका रात्रीत डॉ. बागूल महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोचले. 

मराठी वाहिनीच्या माध्यमातून संधीचे सोने 

कोरोनामुळे अस्वस्थ मुंबापुरीतील स्वीच ऑफ झालेले टीव्ही सिरीयलचे कॅमेरे नाशिकच्या निसर्गसौंदर्य नगरीत नवे चेहरे शोधत नव्या वाटा शोधत होते. हीच नामी संधी चैतन्यच्या पुढ्यात येऊन एका नामवंत मराठी वाहिनीच्या माध्यमातून संधीचे सोने केले. आज या वाहिनीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतून रोजच डॉ. बागूल झळकतात. 

हेही वाचा > तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

केलेले अभिनय 

-मराठी अल्बम गाणी 
-हिंदी अल्बम गाणी 
-अहिराणी गाणी 
-बुरखा रन एपिसोडीक सिनेमा (यू-ट्यूब) 
-सन १९८१ सिनेमा  

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The son of a teacher from Jayakheda, Dr. Chaitanya Bagul Success story nashik marathi news