मेट्रो स्थानकालगतच्या भूखंडांना ‘अच्छे दिन’; नवीन व्यावसायिक केंद्रे उदयास येणार

विक्रांत मते
Tuesday, 2 February 2021

केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक मेट्रोसाठी दोन हजार ९२ कोटी रुपयांची घोषणा होताच आता व्यवसाय व निवासासाठी मेट्रो स्थानकालगतच्या जागांना मागणी वाढण्यास सुरवात झाली आहे. बिल्डर्सकडून मेट्रो स्थानकालगतच्या जागांचा शोध सुरू झाला आहे.

नाशिक : केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक मेट्रोसाठी दोन हजार ९२ कोटी रुपयांची घोषणा होताच आता व्यवसाय व निवासासाठी मेट्रो स्थानकालगतच्या जागांना मागणी वाढण्यास सुरवात झाली आहे. बिल्डर्सकडून मेट्रो स्थानकालगतच्या जागांचा शोध सुरू झाला आहे. यामुळे मेट्रो स्थानकालगतच्या भूखंडांना अचानक ‘अच्छे दिन’ आले आहेत. 

देशातील पहिल्या हायस्पीड टायरबेस एलिव्हेटेड ‘मेट्रो निओ’ प्रकल्पासाठी केंद्र सरकारने दोन हजार ९२ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. महामेट्रोतर्फे मार्ग उभारताना २०२३ पर्यंतचे नियोजन केले आहे. मात्र, प्रकल्प मंजुरीला विलंब लागल्याने किमान वर्षभर मेट्रोचा प्रकल्प लांबला जाण्याची शक्यता आहे. ३१.४० किलोमीटर लांबीच्या एलिव्हेटेड मार्गावर २५ मीटर लांबीच्या अडीचशे प्रवासी क्षमतेची बस धावतील. मेट्रोसाठी पहिल्या टप्प्यात दोन मार्ग निश्‍चित केले आहेत. पहिला टप्पा दहा, तर दुसरा टप्पा २२ किलोमीटरचा आहे. प्रकल्पाच्या एकूण किमतीपैकी ६० टक्के १,१६१ कोटी रुपये कर्जरोख्याच्या माध्यमातून उभारले जाणार आहेत. केंद्र सरकार २०, तर राज्य सरकार २० टक्के निधी देणार आहे. महापालिका व सिडकोतर्फे ५५२ कोटी रुपये उभारले जातील. केंद्र सरकारकडून ३८७ कोटी रुपये प्रकल्पासाठी मिळणार आहेत. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

नवीन व्यावसायिक केंद्रे उदयास येणार 

मुंबई, ठाणे व पुणे शहरांत निवास किंवा व्यवसायासाठी जागा घेताना रेल्वेस्थानकाच्या परिसरात शोध घेतला जातो. नाशिकमध्ये मेट्रोची घोषणा झाल्यानंतर मेट्रो स्थानकालगतच्या जागांबाबतही अशीच परिस्थिती निर्माण होणार आहे. मेट्रोसाठी ३० स्थानकांची निर्मिती केली जाणार असून, स्थानकांजवळचे भूखंड नाशिकचे व्यावसायिक केंद्रे म्हणून उदयाला येणार आहेत. 

व्यवसायाची नवी केंद्रे 

शालिमार, मेन रोड, सीबीएस, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, मुंबई नाका, द्वारका या पारंपरिक व्यवसाय केंद्रांबरोबरच मेट्रोमुळे नवीन व्यावसायिक केंद्रे विकसित होतील. पहिल्या टप्प्यातील मार्गिकेवर गंगापूर पहिले स्थानक असेल. आतापर्यंत गंगापूर भागाला आर्थिकदृष्ट्या महत्त्व नव्हते. मात्र, आता पहिल्या स्थानकामुळे या भागाचे महत्त्व वाढेल. टप्प्याटप्प्याने जलालपूर, काळेनगर, जेहान सर्कल, थत्तेनगर, शिवाजीनगर, पंचवटी या स्थानकांच्या परिसरात नवे बिझनेस सेंटर तयार होतील. दुसऱ्या मार्गिकेवरील ध्रुवनगर, श्रमिकनगर, सातपूर कॉलनी, मायको सर्कल, नाशिक रोड भागातील टाकळी रोडवरील समतानगर, गांधीनगर, नेहरूनगर, दत्तमंदिर या भागात नवीन बिझनेस सेंटर उदयाला येतील. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

सीबीएस, मुंबई नाक्‍याचे महत्त्व वाढणार 

महामेट्रोचे सीबीएस व मुंबई नाका संयुक्त स्थानक राहणार असल्याने या भागाचे महत्त्व अधिक अधोरेखित होणार आहे. सीबीएस भाग सध्या शहराचे महत्त्वाचे आर्थिक केंद्र आहे. मात्र, वाढत्या गर्दीमुळे, तसेच मुंबई नाका भागात व्यवसायवृद्धीला अधिक संधी असल्याने या भागाचे महत्त्व वाढेल. मुंबई नाका येथे बस डेपो, मुंबई व शहराच्या बाहेर पडण्यासाठी मोठ्या रस्त्यांची सोय असल्याने भविष्यातील व्यवसायाचे केंद्र म्हणून उदयाला येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: space around the metro station will be developed Nashik Marathi news