ऑक्सिजन पुरवठ्याचे गौडबंगाल! बोगस ऑक्सिजन कंपन्या शोधासाठी विशेष मोहीम 

विनोद बेदरकर
Friday, 9 October 2020

नाशिकमध्ये पूर्वी सहा व आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन अशा नऊ उत्पादकांना परवानगी आहे. कुणीही उत्पादक केवळ दुकान परवाना (शॉपॲक्ट) व जीएसटी नंबर घेऊन औद्योगिक क्षेत्रातील ऑक्सिजन पुरवठा करू शकतो, तर अत्यावश्‍यक काळात शासनाने केवळ नोंदणी असलेल्या सहा जणांची यादी केली आहे.

नाशिक / सातपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना ऑक्सिजन पुरवठ्याच्या काळ्या बाजाराच्या ‘सकाळ’मधील बातमीची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांनी तत्काळ बैठक घेत, जिल्ह्यातील एकूण नऊ ऑक्सिजन उत्पादन कंपन्या सोडून काही छोटे वितरक व सप्लायर्स यांनी रुग्णालय सोडून जर औद्योगिक वापरासाठी सिलिंडर दिला असेल, तर त्याबाबत कारवाई करणार असल्याचे ‘सकाळ’ला सांगितले. 

बोगस ऑक्सिजन कंपन्या शोधासाठी विशेष मोहीम 
कोरोना काळात लोकांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू होत असताना अत्यावश्‍यक व्याख्येतील मेडिकल ऑक्सिजनच्या उत्पादनासाठी फक्त अन्न व औषध प्रशासनाच्या नमुना २५ अंतर्गत औषधे व प्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ अंतर्गत परवानगी दिली जाते. या कायद्याने नाशिकमध्ये पूर्वी सहा व आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन अशा नऊ उत्पादकांना परवानगी आहे. कुणीही उत्पादक केवळ दुकान परवाना (शॉपॲक्ट) व जीएसटी नंबर घेऊन औद्योगिक क्षेत्रातील ऑक्सिजन पुरवठा करू शकतो, तर अत्यावश्‍यक काळात शासनाने केवळ नोंदणी असलेल्या सहा जणांची यादी केली आहे. नाशिक जिल्ह्यात २५ पेक्षा जास्त विनानोंदणी छोटे-मोठे ऑक्सिजन ट्रेडर्स व वितरक आहेत. यांच्यातील काही लोक एकत्र येऊन आज ऑक्सिजन पुरवठ्याला परवानगी देण्याची मागणी केली. 

विक्रीवर नियंत्रण कुठे? 
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबत ऑक्सिजनची मागणी वाढल्याने, औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांचा ऑक्सिजनचा पुरवठा पूर्णपणे बंद होता, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात तसे नव्हते. कारण जिल्ह्यात २५ च्या आसपास ऑक्सिजन प्लॅट असून, त्यापैकी केवळ सहा प्लॅटचा ऑक्सिजन पुरवठा उद्योगासाठी बंद होता. सरसकट उद्योगांचा पुरवठा बंद नव्हताच, तसेच त्या 
विनानोंदणी ऑक्सिजन उत्पादकांनी काय भावाने ऑक्सिजन विकले याचे कुठलेही नियंत्रण नाही की त्याच्या नोंदी नाहीत. त्यामुळेच कोरोना काळात विनानोंदणी ऑक्सिजन कंपन्यांनी औद्योगिक क्षेत्राऐवजी रुग्णालयांना लागणाऱ्या मेडिकल ऑक्सिजन पुरवठ्यास प्राधान्य देऊन प्रशासनास सहकार्य केले आहे, असा त्याचा दावा कितपत गंभीर मानायचा हा प्रश्‍नच आहे. 

हेही वाचा > दिघावकर साहेब लक्ष असू द्या! व्यापाऱ्याकडून धूळगावच्या शेतकऱ्यांची फसवणूक 

काय आहेत नियम 
- प्रत्येक दिवसाच्या पुरवठ्याचे रेकॉर्ड 
- फक्त रुग्णालयात करावा लागतो पुरवठा 
- शॉपॲक्ट, जीएसटी घेऊन कुणी करू शकतो 
- २५ उत्पादक असूनही सहा जणांचा यादीत समावेश 

हेही वाचा > धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनी मुक्तिभूमी राहणार सुनीसुनी! केवळ शासकीय पदाधिकारीच राहणार उपस्थित

आम्हाला परवानगी द्या 
तर दुसरीकडे नोदणी न केलेल्या छोट्या गॅस टेड्रर्स विक्रेत्यांनी आम्हाला उत्पादकासारखा पुरवठा करण्याची कायदेशीर परवानगी देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. 

गुप्त माहिती कळवा 
उद्योग संघटनांनी चढ्या दराने ऑक्सिजन विक्री करणाऱ्या ऑक्सिजन वितरकांबाबत अन्न, औषध भेसळ प्रतिबंधक विभागाला गुप्त माहिती द्यावी. - माधुरी पवार (सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन)  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special campaign to find bogus oxygen companies nashik marathi news