धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनी मुक्तिभूमी राहणार सुनीसुनी! केवळ शासकीय पदाधिकारीच राहणार उपस्थित

संतोष विंचू
Thursday, 8 October 2020

धर्मांतर घोषणा निमित्त यावर्षी केवळ शासकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन व क्रांतीस्तंभास मानवंदना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर कोणत्याही व्यक्तीला मुक्तीभूमीवर प्रवेश दिला जाणार नाही असे पोलिस प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

येवला (जि.नाशिक) : १३ ऑक्टोरबर १९३५ रोजी येथील गावालगतच्या न्य्यायालया जवळच्या मैदानावर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी "मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही...” हि धर्मातराची ऐतिहासिक घोषणा केली होती.या घोषणेचा वर्धापनदिन येथे प्रत्येक वर्षी भीमसैनिक लाखोच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा करतात.मात्र यंदा कोरोणामुळे गर्दी टाळण्यासाठी १३ ऑक्टोबर रोजीचा धर्मांतर घोषणेचा ८५ वा वर्धापन दिन साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे.

पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन व क्रांतीस्तंभास मानवंदना
शहर पोलीस ठाण्यात सोमवारी विविध रिपब्लिकन संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी सांगितले.जागतिक पटलावर चळवळीचा संदर्भ मिळून बौद्ध धर्मीयांसाठी हि भूमी तीर्थस्थानच बनली आहे. म्हणूनच धर्मांतराची घोषणा केली, ती जागा म्हणजेच शहरातील न्यायालयाजवळील मैदान मुक्तिभूमी नावाने ओळखले जाते. येथे धर्मांतराची घोषणा केल्यानंतर डॉ. आंबेडकरांनी सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास करून तब्बल 21 वर्षांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोरबर 1956 ला लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची धम्मदीक्षा दिली. त्यामुळेच जसा येवला हा धर्मांतराचा पाया, तसा नागपूर हा कळस मानला जातो.

दरवर्षी लाखांच्या संख्येने आंबेडकरी जनतेची हजेरी

धर्मांतर घोषणेच्या दरवर्षीच्या वर्धापन दिनाला येवला शहरातील मुक्ती भूमीवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखांच्या संख्येने आंबेडकरी जनता हजेरी लावत असते. यंदा करोनाच्या संकट काळात भारतीय बौद्ध महासभा, मीराताई आंबेडकर पुरस्कृत मीराताई आंबेडकर प्रतिष्ठान, बार्टी व सर्व दलित पक्ष संघटनांच्या वतीने १३ ऑक्टोबरचे धर्मांतर घोषणा निमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. धर्मांतर घोषणा निमित्त यावर्षी केवळ शासकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन व क्रांतीस्तंभास मानवंदना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर कोणत्याही व्यक्तीला मुक्तीभूमीवर प्रवेश दिला जाणार नाही असे पोलिस प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा

विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित

बैठकीला पोलीस निरीक्षक संदीप कोळी,निवासी नायब तहसीलदार राजेंद्र राऊत,उपमुख्यधिकारी प्रवीणकुमार पाटील,चंद्रकांत निर्मळ, मुक्तिभुमी येथिल बार्टीच्या संशोधन अधिकारी पल्लवी पगारे,जेष्ठ नेते गुड्डू जावळे,महेंद्र पगारे,संजय पगारे,रणजीत संसारे,साबळे,बाळासाहेब कसबे आदीसह बौद्ध महासभा,रिपब्लिकन संघटनांचे पदाधिकारी आदींची यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा >  भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी

संपादन - ज्योती देवरे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No one will be present at Muktibhoomi due to corona nashik marathi news