माहेरवाशिणींचे मोठे हाल! ऐन दिवाळीत प्रमुख रेल्वेगाड्या रद्द, बसही अपुऱ्या

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

सगळी भिस्त खासगी वाहने, दुचाकीवर अवलंबून आहे. त्यामुळे लहान मुलांसह महिलांची दुचाकीवरील वाहतूक धोकेदायक ठरत आहे. खासगी वाहनांत मर्यादित सीट भरण्याच्या नावाखाली प्रचंड भाडेवाढ झाली आहे.

नाशिक रोड : दिवाळीत गोदावरी, राज्यराणी, भुसावळ-पुणे, भुसावळ-मुंबई पॅसेंजर या प्रमुख रेल्वेगाड्या बंद असताना पुरेशा बसही सुरू नसल्याने भाऊबीजनिमित्त माहेरी जाणाऱ्या महिला, लहान मुलांची मोठी गैरसोय सुरू आहे. खासगी वाहतुकीपोटी भुर्दड सोसावा लागतो आहे.

मनमाड- पंचवटी या एकमेव गाडीवर प्रवाशांची भिस्त 

सात महिन्यांपासून कोरोनाच्या लॉकडाउनमुळे अनेक कुटुंबांवर घरात कोंडून घेण्याची वेळ आली. आता अनलॉक सुरू झाल्यानंतर दिवाळी सणानिमित्ताने महिलांना माहेरी जाण्याचे वेध लागले असताना मध्य रेल्वेच्या प्रमुख गाड्या रद्द आहे. एका बाजूला रेल्वेने विशेष यात्रा स्पेशल गाड्या सुरू केल्या असताना मुंबईला जाण्या- येण्यासाठी प्रमुख गाड्या मात्र बंदच ठेवल्या आहेत. मनमाड- पंचवटी या एकमेव गाडीवर प्रवाशांची भिस्त आहे. 

प्रवाशांची चांगलीच गैरसोय सुरू 

मुंबईला जाण्याच्या गोदावरी, राज्यराणी, तसेच भुसावळ-पुणे, भुसावळ-मुंबई पॅसेंजर या प्रमुख गाड्या अजूनही बंदच आहेत. त्यामुळे सणासुदीत हजारो प्रवाशांची गैरसोय सुरू आहे. मुंबई-भुसावळ अशा दुर्तफा जाण्यासाठी प्रमुख रेल्वेगाड्याच नाहीत. लहान-मोठ्या स्थानकांवरील प्रवाशांची चांगलीच गैरसोय सुरू आहे. दिवाळीत पॅसेंजर इगतपुरी नंतर घोटी, अस्वली, लहवित, देवळली कॅम्प, नाशिक रोड, ओढा, खेरवाडी, कसबे सुकेणे, निफाड, उगाव आदी लहान स्थानकांवरील माहेरी निघालेल्या महिला, लहान मुलांना सोयीची ठरते.

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 

बससेवा अपुरी

ग्रामीण भागातील गावात जाणाऱ्या बससेवा बंद आहेत. शासनाने नियमांचे पालन करून या गाड्या सुरू कराव्यात. नियमानुसार सोशल डिस्टन्सिंग पाळून गाड्या सुरू कराव्यात, ही मागणी लालफितीत आहे. प्रमुख मार्गावरच बससेवा सुरू असल्याने ग्रामीण खेड्यातील महिलांचे प्रचंड हाल सुरू आहे. सगळी भिस्त खासगी वाहने, दुचाकीवर अवलंबून आहे. त्यामुळे लहान मुलांसह महिलांची दुचाकीवरील वाहतूक धोकेदायक ठरत आहे. खासगी वाहनांत मर्यादित सीट भरण्याच्या नावाखाली प्रचंड भाडेवाढ झाली आहे.

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: specific trains closed on Diwali nashik marathi news