
बर्ड फ्लू हा आजार पक्ष्यांकडून पक्ष्यांना होतो. मात्र देशात हा आजार माणसांमध्ये पोचल्याचे उदाहरण उपलब्ध नाही. त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही. म्हणूनच बर्ड फ्लूबाबत गैरसमज आणि अफवा पसरवू नका, या बाबी सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
नाशिक : बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर चिकन, अंडी शिजवून खाण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. अशातच, बुधवारी (ता.१३) राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी पिलांसह अंडी व कोंबड्यांसाठी राज्याच्या सीमा खुल्या राहतील, अशी ग्वाही दिली. चिकन आणि अंड्यांवर कुठल्याही प्रकारचे बंधन घातलेले नाही, असे सांगत एखाद्या राज्याच्या सीमा बंद असल्याची अडचण भासल्यास उत्पादकांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा, असे त्यांनी सुचवले.
बर्ड फ्लूबाबत गैरसमज आणि अफवा पसरवू नका
राज्यातील गावठी आणि ब्रॉयलर कोंबड्या उत्पादकांशी सिंह यांनी ऑनलाइन संवाद साधला. त्या वेळी ते म्हणाले, की अंडी व चिकन ७० अंश सेंटिग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रिय होतो. अंडी व चिकन खाणे पूर्णपणे सुरक्षित आहे. त्याचप्रमाणे बर्ड फ्लू हा आजार पक्ष्यांकडून पक्ष्यांना होतो. मात्र देशात हा आजार माणसांमध्ये पोचल्याचे उदाहरण उपलब्ध नाही. त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही. म्हणूनच बर्ड फ्लूबाबत गैरसमज आणि अफवा पसरवू नका, या बाबी सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
पुण्यात पहिला चिकन महोत्सव
ग्राहकांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून कोंबड्या उत्पादकांनी चिकन महोत्सव जिल्हास्तरावर घ्यावा. त्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांची मान्यता घेतली जावी, असे सिंह यांनी सुचवले. त्यानुसार पहिला चिकन महोत्सव उत्पादक आणि पशुसंवर्धन विभागातर्फे पुण्यात होत आहे. पोल्ट्री फार्मर्स ॲन्ड बिडर्स असोसिएशनतर्फे नाशिकचे जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांची भेट घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोटेखानी चिकन महोत्सव घेण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. कोरोना विषाणू संसर्गाची अफवा पसरली असताना ग्राहकांमध्ये आत्मविश्वास वाढावा म्हणून नाशिकमध्ये मार्चमध्ये लॉकडाउनच्या आधी चिकन महोत्सव घेण्यात आला होता. त्यातूनच चिकनचा खप वाढल्याचे उत्पादकांच्या निदर्शनास आले आहे.
मध्य प्रदेशची सीमा खुली
तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेशच्या सीमा राज्यालगत आहेत. या सीमांवर अडचण येणार नाही, असा विश्वास सिंह यांनी उत्पादकांना दिला होता. अशातच, आज मध्य प्रदेशच्या महामार्गावरून बंद झालेली कोंबड्यांची वाहतूक खुली झाली आहे. त्यामुळे गुरुवारच्या (ता. १४) संक्रांतीनंतर तीन दिवस गुजरात आणि मध्य प्रदेशातील साजरा होणाऱ्या सणासाठी कोंबड्या जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ऑनलाइन संवादासाठी असोसिएशनचे अध्यक्ष वसंतकुमार शेट्टी, डॉ. प्रसन्न पेडगावकर, डॉ. अजय देशपांडे, नाशिकहून उद्धव अहिरे, श्रीकृष्ण गांगुर्डे, डॉ. अनिल फडके आणि नगर, नागपूर, पुणे, अमरावतीहून प्रतिनिधींसह पशुसंवर्धन विभागाचे डॉ. अजय थोरे, डॉ. राजेश बली आदी उपस्थित होते.
मास्क, ग्लोव्हजचा वापर महत्त्वाचा
कोंबड्या कापल्या जातात, अशा ठिकाणी मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करावा. त्यातून ग्राहकांमध्ये आणखी आत्मविश्वास वाढायला मदत होईल, अशी सूचना सिंह यांनी केली. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पशुसंवर्धन विभागाने कोंबड्या-अंडी उत्पादकांना मदत करण्याची सूचना केल्याचीही माहिती त्यांनी दिली. त्याचवेळी पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्याशी झालेल्या चर्चेतून पुढे आलेल्या मुद्यांविषयी सिंह यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीत सरकारने चिकन आणि अंड्यांच्या सुरक्षेविषयी जाहिरात करावी, अशी मागणी उत्पादकांनी धरली.
हेही वाचा > तरुणाकडून धक्कादायक वस्तू सापडताच पोलीसही हैराण! युवावर्गाला सहज मिळणाऱ्या गोष्टीचा लावणार शोध?
आठवड्याच्या अखेरीस मागणीत वाढ अपेक्षित
गुरुवारच्या उपवासामुळे ग्राहक चिकनला पसंती देत नाहीत. अशातच, उत्पादकांनी बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर दोन ते अडीच किलोच्या ब्रॉयलर कोंबड्यांऐवजी बाराशे ते तेराशे ग्रॅम वजनाच्या कोंबड्या बाजारात विक्रीसाठी आणल्या. परिणामी, कोंबड्यांचा किलोचा भाव ५२ ते ५३ रुपयांपर्यंत कमी झाला होता. तरीही शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मागणीत वाढ उत्पादकांना अपेक्षित आहे.
हेही वाचा > एकच व्यवहार आणि जर्मनीला उच्च शिक्षण घेण्याचे तरुणाचे स्वप्न क्षणार्धात भंगले!