आरोग्य विभाग रडारवर! खासगी रुग्णालयांमधील लूट थांबवा; अन्यथा नगरसेवक उतरणार रस्त्यावर

corona ward.jpg
corona ward.jpg

नाशिक : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना हजाराच्या पटीत रुग्ण दाखल होत आहेत. परंतु महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सुविधा तर नाहीच, शिवाय खासगी रुग्णालयांमध्ये अद्यापही लूट सुरू असल्याने असे प्रकार थांबवा, अन्यथा नगरसेवकांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा स्थायी समितीच्या सभेत गुरुवारी (ता.२४) देण्यात आला. 

स्थायी सभेत नगरसेवक आक्रमक

शहरात कोरोनारुग्णांची संख्या पन्नास हजारांचा आकडा पार करत असताना अद्यापही महापालिकेच्या सुविधा ताळ्यावर येत नसल्याने स्थायी समितीच्या सभेत पुन्हा नगरसेवकांचा बांध फुटला. ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी प्रथम ऑक्सिजन पुरवठ्याचा विषय चर्चेला आणला. त्या वेळी प्रशासनाकडून अजब उत्तर मिळाले. ऑक्सिजनअभावी रुग्णांची हेळसांड होत असताना अद्यापही नवीन बिटको प्लॅन्ट उभारण्यात आला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. 

लवकरच ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्याच्या सूचना

पंधरा दिवसांपूर्वी नवीन बिटको रुग्णालय व डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु सध्या फाउंडेशनच्या कामावरच महापालिकेचे घोडे अडकल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्या माहितीतून स्पष्ट झाले. फाउंडेशनपूर्वी टाक्या येणे महत्त्वाचे असल्याने त्यासाठी पंधरा दिवस लागणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे गरीब रुग्णांना ऑक्सिजनसाठी पंधरा दिवस वेटिंगवर जाण्याची भीती निर्माण झाली. सभापती गणेश गिते यांनी लवकर ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्याच्या सूचना दिल्या. 

रेमडेसिव्हिरचा काळा बाजार 

एकीकडे ऑक्सिजनचे बेड मिळत नसताना शहरात खासगी रुग्णालयांकडून रेमडेसिव्हिरचा काळा बाजार होत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होत आहे. रुग्णालयांकडून उपचार करताना रुग्णांच्या नातेवाइकांनाच औषध उपलब्ध करून देण्याची मागणी होत असून, अन्न व औषध प्रशासनाने ठराविक व मोठ्या रुग्णालयांमधील मेडिकलमध्येच रेमडेसिव्हिर औषध विकण्यास परवानगी दिली आहे. औषधांचा काळा बाजार होत असल्याचा आरोप प्रा. वर्षा भालेराव यांनी केला. 

व्हेंटिलेटर महापालिकेचे, वसुली खासगी रुग्णालयांची 

पीएम केअर फंडातून नाशिक महापालिकेला ५६ व्हेंटिलेटर प्राप्त झाले होते. त्यातील पंधरा व्हेंटिलेटर नादुरुस्तीवरून महापालिका प्रशासन अडचणीत सापडले होते. आता ज्या खासगी रुग्णालयांना बारा व्हेंटिलेटर वापरण्यासाठी देण्यात आले, त्यांच्याकडून महापालिकेने दिलेल्या व्हेंटिलेटरचा धंदा मांडण्यात आला आहे. दिवसाचे हजारो रुपये आकारले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. नवीन बिटको रुग्णालयात एकच स्ट्रेचर, प्रशासनाकडून तीन स्ट्रेचरचा खुलासा करण्यात आला. प्रा. शरद मोरे यांनी बिटको रुग्णालयात रुग्णांना गरम पाणी मिळत नसल्याची तक्रार केली.  

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com