'सरकार मायबाप! आता कांदा विकू तरी कसा?' शेतकरी हतबल

onion (1).jpg
onion (1).jpg

नाशिक : (पिंपळगाव बसवंत) बाजार समितीत कांद्याला ७०० ते ८०० रुपये क्विंटल असा न परवडणारा दर मिळत असल्याने चाळीत पडून असलेल्या कांद्याची प्रत घसरत चालली असून, आता चाळीतील कांदा सडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शासनाने कांद्याच्या दरात हस्तक्षेप करून किमान दोन हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

एकरी १२५ क्विंटलपर्यंत उत्पादन 

डिसेंबर २०१९ मध्ये कधी नव्हे तो कांद्याच्या दराने दहा हजारांचा पल्ला गाठला होता. हा उच्चांकी भाव पाहून नाशिक जिल्ह्यातील उन्हाळ कांद्याची सुमारे १६ हजार हेक्टरवर लागवड झाली. चांदवड, मालेगाव, येवला, सटाणा परिसरात कांद्याची बंपर लागवड झाली. पाऊस आणि हवामान चांगले असल्याने एकरी १२५ क्विंटलपर्यंत उत्पादन गेले. दर वर्षी जून महिन्यानंतर कांद्याला मागणी वाढते आणि त्यामुळे जुलै, ऑगस्टमध्ये समाधानकारक भाव मिळेल या आशेने कांदा उत्पादकांनी चाळीत कांदा साठवून ठेवला. पण कोरोनामुळे जुलै महिना संपत आला तरी बाजारात कांद्याची अपेक्षित भाववाढ झालेली नाही. कांद्याच्या दराने यंदा उत्पादकांना धोका दिला आहे. 

दराबाबत सकारात्मक पाऊल उचला 

कांद्याला भाव मिळत नसल्याने चाळीत साठविलेल्या कांद्यात अंदाजे २० ते ३० टक्के घट झाली आहे. यातच कांदा सडण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकरी हतबल आहेत. सध्याचे दर पाहता उत्पादन खर्चही निघणे मुश्‍कील झाल्याने यंदा कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणार अशी स्थिती आहे. अजून दर घसरण्याच्या भीतीने हतबल झालेले शेतकरी कांदा विक्रीसाठी घाई करू लागले आहेत. पिंपळगाव बसवंत, लासलगाव बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. दरवाढीत हस्तक्षेप करणाऱ्या शासनाने घसरलेल्या दराबाबत सकारात्मक पाऊल उचलावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

निर्यातीमुळे दराला आधार 

देशासह परदेशात कांद्याची मागणी घटली असल्याने कांद्याचा उठाव नाही. त्यात आशेचा किरण म्हणजे गेल्या महिन्याभरापासून दररोज साडेतीन हजार टन कांद्याची बांगलादेशात निर्यात होत आहे. आतापर्यंत सव्वा लाख टन कांदा बांगलादेशला पोचला आहे. त्यामुळे दराला आधार मिळाला आहे, अन्यथा कांद्याचे दर ३०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरले असते, अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. 

कुणीच लक्ष द्यायला तयार नाही 

केंद्र सरकारच्या निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा मातीमोल विकावा लागत आहे. साठविलेल्या कांद्याचा दर्जा ढासळत असून, घसरलेल्या दराबाबत कुणीच लक्ष द्यायला तयार नाही. सरकारने २० रुपये किलोने कांदा खरेदी करावा, तरच उत्पादन खर्च निघेल असे निंबाळे, ता. चांदवड येथील शेतकरी अर्जुन गांगुर्डे यांनी सांगितले. तर शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा मातीमोल विकावा लागत आहे. भांडवलाचा खर्च निघून प्रपंचाला हातभार लागेल असा बाजारभाव मिळवून देण्यासाठी शासनाने लक्ष द्यावे, असे आवाहन वाकी, ता. चांदवड येथील शेतकरी अलका गोरडे यांनी केले. 

अन्यथा दरात मोठी घसरगुंडी 

लॉकडाउनमुळे हॉटेल बंद असल्याने मागणीत मोठी घट झाली. सिलीगुडी, पाटणा येथे कडकडीत लॉकडाउनमुळे बाजारपेठा बंद आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यात दररोज एक लाख कांद्याची बंपर आवक होत आहे. बांगलादेशने सध्यातरी तारले आहे, अन्यथा दरात मोठी घसरगुंडी झाली असती. - अतुल शाह, कांदा निर्यातदार, पिंपळगाव बसवंत 

(संपादन - किशोरी वाघ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com