बेशिस्तांवर कठोर कारवाईच! आरोग्य, वैद्यकीय विभागाच्या बैठकीत महापौरांच्या स्पष्ट सूचना

विक्रांत मते
Saturday, 19 September 2020

परंतु कोरोना काळात अर्थचक्र बिघडल्याने नागरिकांना दंड परवडणार नाही, दंड करण्यामागे शिस्त लावणे हाच हेतू असल्याने दंडाची रक्कम कमी करून दोनशे रुपयांपर्यंत आणण्याचा निर्णय आयुक्त कैलास जाधव यांनी घेतला. त्या पार्श्‍वभूमीवर महापौर कुलकर्णी यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी बैठक घेतली.

नाशिक : शहरात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत असले तरी नागरिकांनीही नियम पाळून प्रशासनाला साथ देण्याची गरज आहे. शासनाने ठरवून दिलेले नियम पाळणे सर्वांचे कर्तव्य आहे. नियम पाळले जात नसतील तर कठोर कारवाई होणारच, अशी स्पष्टोक्ती महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली. 

आरोग्य, वैद्यकीय विभागाच्या बैठकीत महापौरांच्या स्पष्ट सूचना

‘रामायण’ येथे आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी (ता. १८) झाली. त्या वेळी मास्क, सॅनिटायझेशन, हॅन्डग्लोव्हज घालणे आदींबाबत माहिती देण्यात आली. मंगळवारी झालेल्या ऑनलाइन महासभेत नगरसेवकांच्या तक्रारीवरून मास्क न घालणाऱ्यांवर पाचशे रुपये दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु कोरोना काळात अर्थचक्र बिघडल्याने नागरिकांना दंड परवडणार नाही, दंड करण्यामागे शिस्त लावणे हाच हेतू असल्याने दंडाची रक्कम कमी करून दोनशे रुपयांपर्यंत आणण्याचा निर्णय आयुक्त कैलास जाधव यांनी घेतला. त्या पार्श्‍वभूमीवर महापौर कुलकर्णी यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी बैठक घेतली. महापालिकेतर्फे कोरोनाबाबत बाजारपेठांमध्ये जनजागृती करून मास्कचा वापर करण्याची सक्ती करण्याच्या सूचना दिल्या. शहरातील विविध बाजारपेठांमध्ये नागरिकांच्या दिवसेंदिवस होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव निर्माण होऊ नये यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, मास्कचा वापर करणे व सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी सहा विभागांत स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करून या वाहनांवर ध्वनिक्षेपक लावून त्याद्वारे सूचना देण्यात आल्या.

मास्क वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

नागरिकांनी मास्कचा वापर करावा, याबाबत जनजागृती करून मास्क वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम प्रभावीपणे राबवावी. या मोहिमेसाठी पोलिसांची मदत देण्याच्या दृष्टीने नियोजनाच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीस सभागृहनेते सतीश सोनवणे, भाजप गटनेते जगदीश पाटील, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. कल्पना कुटे, डॉ. राजेंद्र त्र्यंबके, विभागीय अधिकारी स्वप्नील मुदलवाडकर, एल. ए. गायकवाड, जयश्री सोनवणे, मयूर पाटील, नीलेश साळी आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून काम करीत असताना प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःची दक्षता घेऊन विभाग सुरक्षित ठेवावा. कोरोनाच्या लढाईत लोकप्रतिनिधी प्रशासनासोबत आहेत. - सतीश कुलकर्णी, महापौर  

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strict action against the unruly, Clear instructions from the mayor at a meeting of the health, medical department nashik marathi news