औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास कठोर कारवाई : अपर जिल्हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

गरजू रुग्णांना वेळेवर व योग्य किमतीत औषध उपलब्ध होते किंवा कसे याबाबत वेळोवेळी खात्री करावी. उपलब्ध साठ्याची माहिती विक्री ठिकाणाच्या दर्शनी भागात प्रदर्शित केली जाईल याबाबत खात्री करावी. औषधाच्या किमती किंवा उपलब्धतेबाबत तक्रार प्राप्त झाल्यास तत्काळ कारवाईचे निर्देशही दिले आहेत.  

नाशिक : (मालेगाव) शहर व तालुक्यातील एकही रुग्ण रेमडेसिव्हिर औषधापासून वंचित राहता कामा नये. ऑक्सिजनसह औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी प्रशासनाला दिले आहेत.

रेमडेसिव्हिर औषधांचा पुरवठा वेळेवर उपलब्ध व्हावा

रेमडेसिव्हिर या औषधाचा कोरोनारुग्णांसाठी तातडीचे उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर सुरू आहे. या औषधांचा पुरवठा रुग्णांना वेळेवर होणे आवश्यक आहे. औषधांची विक्री व विनियोग यांचा योग्य समन्वय व संनियंत्रण होणे गरजेचे आहे. औषधांच्या साठ्याचे संनियंत्रण करण्यासह मालेगाव शहर व तालुक्यातील रुग्णांना रेमडेसिव्हिर औषधांचा पुरवठा वेळेवर उपलब्ध व्हावा यासाठी उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा व औषध निरीक्षक अन्न व औषध प्रशासन श्री. देशपांडे यांची नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. 

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

तक्रार प्राप्त झाल्यास तत्काळ कारवाईचे निर्देश

मालेगाव येथील कोविड रुग्णालयाची रेमडेसिव्हिर या औषधांची दैनंदिन मागणी व उपलब्धता विचारात घेऊन आवश्यक मागणी घटना व्यवस्थापक व सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन, नाशिक यांच्याकडे पाठवून मागणीप्रमाणे औषधसाठा वेळेवर उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करावा, रेमडेसिव्हिर या औषधाची विक्री करताना शासनाच्या सर्व नियमांचे पालन संबंधित वितरण विक्रीच्या ठिकाणावरून होते किंवा नाही, गरजू रुग्णांना वेळेवर व योग्य किमतीत औषध उपलब्ध होते किंवा कसे याबाबत वेळोवेळी खात्री करावी. उपलब्ध साठ्याची माहिती विक्री ठिकाणाच्या दर्शनी भागात प्रदर्शित केली जाईल याबाबत खात्री करावी. औषधाच्या किमती किंवा उपलब्धतेबाबत तक्रार प्राप्त झाल्यास तत्काळ कारवाईचे निर्देशही दिले आहेत.  

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strict action in case of artificial shortage of medicines- Nikam nashik marathi news