esakal | लॉकडाउनची पूर्वीप्रमाणेच कडक अंमलबजावणी ! - भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown 2.jpg

कोरोनाबाधितांची संख्या सप्टेंबर महिन्यापर्यंत कमी झाली होती. दसरा, दिवाळीनंतर रोज ८० ते १०० सरासरीने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे पहिली लाट संपलेली नाही.

लॉकडाउनची पूर्वीप्रमाणेच कडक अंमलबजावणी ! - भुजबळ

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : कोरोनाची पहिलीच लाट संपण्याऐवजी त्यात चिंताजनक वाढ होत आहे. कोरोनाची तीव्रता लक्षात येऊनही कोरोनाला गांभीर्याने घेतले जात नसेल, तर पूर्वीप्रमाणे कडक निर्बंधाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. 
 

पहिली लाट कायम 
भुजबळ म्हणाले, की कोरोनाबाधितांची संख्या सप्टेंबर महिन्यापर्यंत कमी झाली होती. दसरा, दिवाळीनंतर रोज ८० ते १०० सरासरीने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे पहिली लाट संपलेली नाही. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये पुन्हा कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांच्यावरदेखील उपचाराची गरज असल्याने जिल्ह्यात पोस्ट कोविड मार्गदर्शन केंद्रे सुरू करून पोस्ट कोविड सेंटरमधून बरे झाल्यानंतरदेखील रुग्णांनी काय काळजी घेण्यात यावी, याविषयी माहिती देण्याचे निर्देश भुजबळ यांनी दिले. 

हेही वाचा>> उच्चशिक्षित दिव्यांग रामेश्वरचा संघर्ष! रेल्वे बंदमुळे फरफट; प्रशासकीय सेवेत अधिकारी बनायचे स्वप्न 

कोरोना आढावा बैठकीत निर्णय
कोरोना बरा झाल्यानंतर पुन्हा कोरोनाबाधित होण्याची शक्यता लक्षात घेता बिटको हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालयासह प्रत्येक तालुकास्तरावर तत्काळ पोस्ट कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय आजच्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.

हेही वाचा >> एकुलत्या एक लेकाची जेव्हा निघाली अंत्ययात्रा; मटाणे गावावर शोककळा

हर्ड इम्युनिटी तपासणार 
मालेगावप्रमाणेच नाशिक शहरातील काही भागात नागरिकांची हर्ड इम्युनिटी तपासण्यासाठी महापालिकेतर्फे ‘सिरो टेस्ट’ करण्यात यावी, असे बैठकीत ठरले. लस येईपर्यंत सर्वांनी मास्कचा वापर करावा. दुकानदारांनी ‘नो मास्क, नो एन्ट्री’ नियमाचे काटेकोरपणे पालन करावे. विनामास्क ग्राहकांसोबत व्यवहार करू नये अन्यथा संबंधित दुकान दोन दिवस सक्तीने बंद ठेवण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या. 

चौकट 
पालकमंत्री म्हणाले ः 
- कोविड चाचण्यांची संख्या वाढवावी 
- कोरोनाचे तपासणी अहवाल त्याचदिवशी मिळावे 
- बिटकोत ऑटोमॅटिक एक्स्ट्रशन मशिन बसविणार 
- जिल्ह्यातच तपासणी अहवाल मिळविण्याचे प्रयत्न  

जिल्हाधिकारी कार्यालयात (ता.६) झालेल्या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, महापालिकेचे नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अन्न-औषध प्रशासनाच्या सहआयुक्त माधुरी पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सतीश भामरे आदी उपस्थित होते.