मृत्यूनंतरही मरणयातना! कब्रस्तानमध्ये 'दो गज' जमिनीसाठी कोरोनाग्रस्तांचा मोठा संघर्ष 

dafan.jpg
dafan.jpg

नाशिक : जीवन जगण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केल्यानंतर शेवटच्या क्षणीदेखील दफन विधीसाठी लागणाऱ्या ‘दो गज जमीन’साठी मोठा संघर्ष करण्याची वेळ मुस्लिम समाजातील कोरोनाने मृत झालेल्यांवर आली आहे. कोरोनाच्या भीतीने प्रथम खासगी कब्रस्तानमध्ये विधीस जागा उपलब्ध होत नव्हती. तर शहरात शासकीय किंवा महापालिकेचे एक कब्रस्तान नसल्याने दफनविधीसाठी जागा मिळविण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागला. मात्र बऱ्याच जनजागृतीनंतर आता कुठे परिस्थिती बदलली आहे. 

दो गज जमिनीसाठी कोरोनाग्रस्तांचा मृत्यूनंतरही संघर्ष

आठ महिन्यांत मुस्लिम समाजात कोरोनाबाधितांपैकी उपचारादरम्यान १८५, तर संशयितांपैकी ४९ अशा १९८ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या भीतीमुळे खासगी कब्रस्तानमध्ये मृतदेहांच्या खासगी दफनविधीसाठी ‘दो गज जमीन’ मिळणेदेखील अवघड होते. सामाजिक कार्यकर्ते रिजवान खान यांनी मुस्लिम धर्मगुरू, समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची बैठक घेत कोरोनाग्रस्तांच्या दफनविधीबाबत जनजागृतीचा प्रयत्न केला. त्यानंतर शहरातील सर्वच कब्रस्तानमध्ये कोरोनाने मृत झालेल्या मुस्लिम बांधवांच्या दफनविधीस सुरवात झाली. बहुतांश दफनविधी शहरातील मध्यवर्ती असलेल्या जुने नाशिक भागातील कब्रस्तानमध्ये झाले. दफनविधीच्या जागेचा प्रश्‍न सुटल्यानंतर दफनविधी कोण करणार, असे प्रश्‍न निर्माण झाले. 

अनेक प्रयत्नांनंतर यश 
नातेवाइकांच्या मनातील भीती आणि कुटुंबीयांना संसर्ग टाळण्यासाठी त्यांना मृतदेहाजवळ येण्याची परवानगी नाही. अशावेळी रिजवान खान, फिरोज शेख, रफिक साबीर, आसिफ शेख, मोबीन पठाण, तनवीर बिसमिल्लाह, झहिर शेख, अकरम शेख आदींनी दफनविधीची जबाबदारी स्वीकारत, पीपी किट परिधान करून रुग्णालयातून मृतदेह घेऊन जाणे, धार्मिक विधी करणे, कबर खोदण्याच्या कामासह विविध प्रकारच्या कामांतून कोरोनायोद्धाची भूमिका साकारली. हे करताना रफीक साबीर यांना कोरोनाची लागण झाली. रिजवान खान यांनाही काही प्रमाणात त्रास जाणवत असल्याने त्यांच्यावरही काही दिवस संशयित म्हणून क्वारंटाइन करून उपचार झाले. उपचारानंतर पुन्हा त्यांनी त्यांचे कार्य सुरू ठेवले आहे. 

कब्रस्तानमध्ये दफनविधीसाठी जागा मिळविताना सुरू होती दमछाक

जुने नाशिक येथील जहाँगीर, रसुलबाग, काजी, खतीब, शहाजानी, वडाळागाव येथील गौसिया सातपूर येथील रजवीयाँ, गवळाणेतील मनपा कब्रस्तान येथे दफनविधी झाले. सातपूर येथील कब्रस्तानमध्ये पाच दफनविधी झाले. ख्रिस्ती समाजातील १९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांच्यावर सारडा सर्कल येथील कब्रस्तानमध्ये दफनविधी झाला. त्याठिकाणी सतीश म्हस्के, विशाल म्हस्के यानी कोरोनायोद्धाची भूमिका साकारली. 


महिनानिहाय मृत्यू 
महिना कोरोनाने मृत्यू संशयित मृत्यू एकूण 

मे ०४ ०१ ०५ 
जून ३४ २४ ५८ 
जुलै ४१ १४ ५५ 
ऑगस्ट २६ ०२ २८ 
सप्टेंबर २८ ०६ ३४ 
ऑक्टोबर ०८ -- ०८ 
नोव्हेंबर ०४ ०१ ०५त्  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com