पुणे विद्यापीठाच्‍या परीक्षेत दुसऱ्या दिवशीही गोंधळ; विद्यार्थ्यांना पुन्हा मनस्‍ताप

अरुण मलाणी
Tuesday, 13 October 2020

विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाइन व ऑफलाइन असे दोन्‍ही पर्याय उपलब्‍ध करून दिले होते. ऑनलाइन परीक्षा देताना तांत्रिक अडचण उद्‌भवू नये, म्‍हणून काही विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षेचा पर्याय निवडला. परंतु अशा विद्यार्थ्यांना सर्वाधिक मनस्‍तापाला सामोरे जावे लागते आहे.

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सोमवार (ता.१२) पासून नियमित व पुर्नपरीक्षार्थींच्‍या लेखी परीक्षांना सुरुवात झाली असून, पहिल्‍या दिवशीच प्रचंड गोंधळ झाला होता. परीक्षेच्‍या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.१३) देखील तांत्रिक अडथळ्यांमुळे विद्यार्थ्यांना मनस्‍तापाला सामोरे जावे लागले. नियोजित वेळेपेक्षा तब्‍बल एक ते दीड तास उशिराने प्रश्‍नपत्रिका विद्यापीठाकडून प्राप्त झाल्‍याने परीक्षेचा सावळा गोंधळ दुसऱ्या दिवशीदेखील सुरूच राहिला. 

कामगिरीवर नकारात्मक प्रभाव पडण्याची भिती

विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाइन व ऑफलाइन असे दोन्‍ही पर्याय उपलब्‍ध करून दिले होते. ऑनलाइन परीक्षा देताना तांत्रिक अडचण उद्‌भवू नये, म्‍हणून काही विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षेचा पर्याय निवडला. परंतु अशा विद्यार्थ्यांना सर्वाधिक मनस्‍तापाला सामोरे जावे लागते आहे. सोमवारप्रमाणे मंगळवारी देखील तांत्रिक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. विविध सत्रांमध्ये ही परीक्षा होत असून, विद्यापीठाकडून नियोजित वेळेत प्रश्‍नपत्रिका उपलब्‍ध करून देण्यात अपयश आले. सकाळी दहाला एम. कॉम अभ्यासक्रमाचा पेपर असताना, प्रत्‍यक्षात साडेअकराला प्रश्‍नपत्रिका उपलब्ध झाल्‍याने दीडतास उशिरा पेपरला सुरुवात झाली. द्वितीय वर्ष बी.एस्सी रसायनशास्‍त्र विषयाची पुर्नपरीक्षा दुपारी एकला नियोजित होती. मात्र, प्रश्‍नपत्रिका उशिराने मिळाली, यातून अडीचला परीक्षेला सुरुवात झाली. दुपारी चारला मायक्रो बायोलॉजी विषयाचा पेपर असताना, अर्धातास उशिराने साडेचारला परीक्षेला सुरुवात झाली. या सर्व गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये दडपण निर्माण होत असून, परिणामी परीक्षेच्‍या कामगिरीवर नकारात्मक प्रभाव पडण्याची भिती व्‍यक्‍त होऊ लागली आहे. विद्यापीठाने या तांत्रिक अडचणींची गंभीरतेने दखल घेत, तातडीने सुधारणा करण्याची मागणी होत आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

ऑनलाइनचाही गोंधळ 

ऑफलाइनप्रकारे काही ठिकाणी ऑनलाइन परीक्षांमध्येही अडचणी आल्‍याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. अनेक विद्यार्थ्यांना प्राप्त लिंकद्वारे पेपर स्‍क्रीनवर दिसत नसल्‍याच्‍या काही तक्रारी होत्‍या. अन्‍य तांत्रिक बाबींमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत व्‍यत्‍यय आले. 

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

 
संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students face difficulties on the second day of Pune University exams nashik news