अंतिम वर्ष परीक्षा आयोजनात विद्यापीठच अनुत्तीर्ण; तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मनस्‍ताप

अरुण मलाणी
Monday, 12 October 2020

ऑनलाइनप्रमाणे ऑफलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. अंतिम वर्षाच्‍या परीक्षा आयोजनात विद्यापीठच अनुत्तीर्ण झाल्‍याचे चित्र पहिल्‍या दिवशी बहुतांश ठिकाणी बघायला मिळाले. 

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्‍या परीक्षांना सोमवार (ता.१२) पासून सुरुवात झाली. ऑनलाइन व ऑफलाइन स्‍वरूपातील या परीक्षेच्‍या पहिल्‍याच दिवशी फज्‍जा उडाला. तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मनस्‍तापाला सामोरे जावे लागले. ऑनलाइनप्रमाणे ऑफलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. अंतिम वर्षाच्‍या परीक्षा आयोजनात विद्यापीठच अनुत्तीर्ण झाल्‍याचे चित्र पहिल्‍या दिवशी बहुतांश ठिकाणी बघायला मिळाले. 

ऑनलाइन - ऑफलाईन  दोन्हीकडे अडचणी

बहुप्रतिक्षित अंतिम वर्ष परीक्षांची विद्यार्थ्यांनी कसून तयारी केलेली होती. परंतु प्रत्‍यक्ष परीक्षा देताना विद्यार्थ्यांच्‍या उत्‍साहावर पाणी फेरले गेले. मोबाईलद्वारे परीक्षा देताना लॉगइन करताना तांत्रिक अडचण उद्‌भवल्‍याने विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावे लागले. ऑफलाइन परीक्षेचा पर्याय निवडून परीक्षा केंद्रावर उपस्‍थित झालेल्‍या विद्यार्थ्यांना प्रश्‍न संच विद्यापीठाकडून उशिराने मिळाल्‍यामुळे नियोजित वेळापेक्षा तब्‍बल दोन ते तीन तास उशिराने पेपर द्यावा लागल्‍याचाही प्रकार विविध ठिकाणी घडला. 

पहिल्‍या दिवशीच परीक्षेचा फज्‍जा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उपलब्‍ध पर्यायानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन अशा दोन्‍ही पद्धतीत परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्‍ध करून दिला होता. ३७ हजार ८४१ विद्यार्थ्यांनी ऑफलाइनचा पर्याय निवडला होता. उर्वरित एक लाख ८५ हजार १७७ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा देण्याचा पर्याय निवडला होता. वस्‍तुनिष्ठ बहुपर्यायी स्‍वरूपात ही परीक्षा होत असून, पहिल्‍या दिवशीच परीक्षेचा फज्‍जा उडाल्‍याने विद्यार्थ्यांना मनस्‍तापाला सामोरे जावे लागले. ऑनलाइन स्‍वरूपातील परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लॉगइन न होणे, ओपीटी प्राप्त न होणे अशा तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. ऑफलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा दहा ते अकरा दरम्‍यान होणार होती. परंतु विद्यापीठातर्फे प्रश्‍नसंच उशिराने प्राप्त झाल्‍याने पेपर बाराला सुरू झाला. परिणामी दुसऱ्या सत्रातील परीक्षादेखील उशिराने सुरू झाली. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

शनिवारी पुनरावृत्ती नको 

सोमवारी (ता.१२) विविध पदवी व पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्‍या परीक्षेत विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. दुसऱ्या टप्‍यात शनिवारी (ता.१७) विविध पदवी, पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्‍या परीक्षा होणार असून, या दिवशी तरी तांत्रिक अडचणी व चुकांची पुनरावृत्ती नको, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्‍यक्‍त केली जात आहे. 

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

संपादन - रोहित कणसे
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students were inconvenienced during the final year exams nashik marathi news