त्या १३ गावांना कोरोना साखळी तोडण्यात यश! वाचा या यशामागची कहाणी

success corona village.jpg
success corona village.jpg

नाशिक : खेड्यांना कोरोना विषाणू संसर्गाने ग्रासले होते. कंटेन्मेंट झोन पाळले जात नसल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालल्याचे निदर्शनास येताच, प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये यंत्रणेने लोकसहभाग घेण्यास सुरवात केली. सरपंचांसोबतच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्यही सक्रिय झाले. त्या १३ गावांना कसे मिळाले कोरोना साखळी तोडण्यात यश..?वाचा सविस्तर

ग्रामपंचायतींची मदत 
लॉकडाउन संपल्यानंतर नाशिकभोवतालच्या खेड्यांना कोरोना विषाणू संसर्गाने ग्रासले होते. कंटेन्मेंट झोन पाळले जात नसल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालल्याचे निदर्शनास येताच, प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये यंत्रणेने लोकसहभाग घेण्यास सुरवात केली. सरपंचांसोबतच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्यही सक्रिय झाले. ग्रामपंचायतींनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदान दिले. थर्मल मीटर, सॅनिटायझर, मास्क, ऑक्सिमीटर, हँडवॉश पुरवितानाच निर्जंतुकीकरणावर भर दिला आहे. सिद्ध पिंप्रीमधील ११ रुग्णांपैकी दहा जणांना घरी पाठविण्यात आले आहे. दर दोन दिवसांनी धुरळणी केली जाते. मळ्यांमध्ये सकाळ, संध्याकाळ फवारणी केली जाते. सरपंच उषा भास्कर ढिकले, जिल्हा परिषदेचे सदस्य यशवंत ढिकले, माजी सभापती अनिल ढिकले आदींचे सहकार्य मिळते, असे ग्रामविकास अधिकारी अजय पुरकर यांनी सांगितले.

१३ गावांमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यात यश

तालुक्यातील ६६ गावांमध्ये ग्रामसमित्या स्थापन झाल्या. रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील ‘हाय रिस्क’ संपर्क शोधण्यापासून विलगीकरण, निर्जंतुकीकरणामध्ये समित्या योगदान देताहेत. त्याचा परिपाक म्हणजे, १३ गावांमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यात यश मिळाले आहे. संसरी गावातील १९ पैकी सात जण घरी परतले आहेत. गावात तीन कंटेन्मेंट झोन आहेत. निर्जंतुकीकरणाची धुरळणी ट्रॅक्टरद्वारे सुरू असताना सरपंच विनोद गोडसे प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतात. शिंदे गावच्या सरपंच माधुरी तुंगार रुग्ण तपासणीपासून ते प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहतात. दहा हजार लोकसंख्या असलेल्या शिंदे गावातील २१ पैकी दहा जण बरे झाले आहेत. विल्होळी गावातील २६ पैकी १६ जण बरे होऊन घरी परतले आहेत. आरोग्य उपकेंद्राला औषध उपलब्ध करून देणे, निर्जंतुकीकरण, हाय रिस्क संपर्क शोधणे अशा कामांमध्ये सरपंच बाजीराव गायकवाड उपस्थित असतात. 

...तरीही काळजी महत्त्वाची 
नाशिकभोवतालच्या गावांमधून शहरवासीयांना दूध, भाजीपाला, अन्नधान्याचा पुरवठा होतो. तसेच शहरातील कंपन्यांसाठी आणि कामासाठी याच गावांतील मनुष्यबळ उपयोगी येते. त्यामुळे भोवतालच्या १३ गावांमधील कोरोनाची साखळी खंडित होण्यात यश मिळविले असले, तरीही काळजी महत्त्वाची आहे. रुग्ण बरे होऊन घरी परतल्यावर पुढील १४ दिवस रुग्ण न आढळणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने या गावांनी खबरदारी घ्यायला हवी. 

२१८ रुग्णांना उपचार करून घरी पाठविले

गटविकास अधिकारी डॉ. सारिका बारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास भोये यांनी दिलेल्या माहितीनुसार माडसांगवी, लाखलगाव, ओढा, शिलापूरसह शेवगेदारणा, पिंपळगाव गरुडेश्‍वर, जाखोरी, गिरणारे, नाईकवाडी, जलालपूर, वाडगाव, राहुरी, विंचूरगवळी या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा आढळलेले नाहीत. मात्र, किमान २८ दिवस या गावांकडे आरोग्य विभागाचे विशेष लक्ष राहणार आहे. तालुक्यात ४३४ रुग्णसंख्या झाली असून, २१८ रुग्णांना उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे.

मृतांची संख्या १४ वर रोखण्यात यश

सद्यःस्थितीत २०२ कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. त्यातील २७ जणांना संदीप फाउंडेशनमधील कोविड केअर सेंटरमध्ये, ८० जणांना कॅन्टोन्मेंट बोर्डच्या रुग्णालयात, जिल्हा रुग्णालय, डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात २० आणि खासगी रुग्णालयांत २२ जण उपचार घेत आहेत. ४३ जण घरीच उपचार घेत आहेत. पहिल्या शंभर रुग्णांमध्ये मृतांची संख्या दहा झाली होती. परिणामी, मृत्यू रोखण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याने आतापर्यंत रुग्णांची संख्या चौपटच्या पुढे जाऊनही मृतांची संख्या १४ वर रोखण्यात यश आले आहे. 

रिपोर्टर - गोपाळ आहेर

संपादन - ज्योती देवरे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com