महावितरणच्या भोंगळ कारभाराचा शेतकऱ्याला फटका; तीन एकरांवरील ऊस जळून खाक 

दीपक खैरनार
Saturday, 16 January 2021

निताणे (ता. बागलाण) येथे वीज कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका ऊस उत्पादक शेतकरी युवराज केदू पवार यांना बसला. त्यांच्या शेतातील तीन एकरांवरील ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले. संक्रांतीच्या दिवशीच शेतकऱ्यावर संक्रांत कोसळल्याने परिसरात महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

अंबासन (जि. नाशिक) : निताणे (ता. बागलाण) येथे वीज कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका ऊस उत्पादक शेतकरी युवराज केदू पवार यांना बसला. त्यांच्या शेतातील तीन एकरांवरील ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले. संक्रांतीच्या दिवशीच शेतकऱ्यावर संक्रांत कोसळल्याने परिसरात महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. 

शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला पण..

निताणे परिसरात मोठ्या प्रमाणावर लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा आहेत. मात्र, दुरुस्तीची मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने ही आग लागल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. शेतकरी युवराज पवार यांच्या ऊसलागवड केलेल्या क्षेत्रातून दोन प्रकारच्या मुख्य वाहिन्या गेल्या आहेत. उसाची वाढ होत असल्याने शेतकऱ्याने कुठलीही हानी होऊ नये यासाठी २० ऑक्टोबर २०२० ला करंजाड येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता देवेंद्र पवार यांना अर्ज दिला होता. त्यानुसार अधिकाऱ्यांनी स्थानिक वायरमनला सूचना केल्या होत्या. मात्र, दुरस्ती करण्यात आली नाही. गुरुवारी (ता. १४) मकरसंक्रांतीच्या दिवशी लोंबकळणाऱ्या तारांमध्ये शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागली. परिसरातील शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पंचायत समिती सदस्य वसंत पवार यांनी तातडीने अग्निशमन यंत्रणेला पाचारण केले होते. मात्र, तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. सदर शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. 

हेही वाचा >  देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस

शॉर्टसर्किटमुळे ऊस जळाल्याची घटना दुर्दैवी आहे. सदर घटनेचा अहवाल चौकशी करून वरिष्ठांकडे सादर करणार आहोत. 
-देवेंद्र पवार, सहाय्यक अभियंता, करंजाड 

निताणेतील शेतकऱ्यांवर महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे संक्रांतीच्या दिवशीच संक्रांत कोसळली आहे. महावितरणला अनेकवेळा तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. गावातही वीजतारांची परिस्थिती वाईट आहे. 
-वसंत पवार, पंचायत समिती सदस्य, बागलाण 

 

हेही वाचा >  लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sugarcane crop caught fire due to a short circuit Nashik marathi news