ऊस उत्पादक म्हणताएत...''पवारसाहेब, दिल्या शब्दाला जागा, अन्यथा बेमुदत उपोषणच!''

माणिक देसाई
Thursday, 26 November 2020

परंतु वर्ष उलटूनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निफाडकर जनतेला निसाका-रासाका हे दोन्ही कारखाने सुरू करण्याचा दिलेला शब्द पाळणार कधी, असा सवाल करत करंजगावचे माजी सरपंच व ऊस उत्पादक खंडू बोडके पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ईमेलवर आपण दिलेला शब्द पूर्ण न केल्याने बेमुदत उपोषण व ठिय्या आंदोलन करण्याचे पत्र पाठविले. 

निफाड (नाशिक) : गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी असलेल्या निफाड तालुक्यातील निसाका व रासाका सुरू करण्यासाठी विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर सभेत आवाहन केले होते की तुम्ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप बनकरांना निवडून द्या, निसाका-रासाका पुन्हा सुरू करू, परंतु वर्ष उलटूनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निफाडकर जनतेला निसाका-रासाका हे दोन्ही कारखाने सुरू करण्याचा दिलेला शब्द पाळणार कधी, असा सवाल करत करंजगावचे माजी सरपंच व ऊस उत्पादक खंडू बोडके पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ईमेलवर आपण दिलेला शब्द पूर्ण न केल्याने बेमुदत उपोषण व ठिय्या आंदोलन करण्याचे पत्र पाठविले. 

ऊस उत्पादकांचे भविष्यही अधांतरित

निफाड तालुक्यातील गोदाकाठमध्ये हजारो हेक्टर ऊस आजही तोडणीअभावी शिल्लक आहे. तसेच गळीत हंगाम सुरू होऊन महिना उलटला असला तरी इतर कारखान्यांकडून उत्पादकांची राजरोसपणे लूटमार सुरू आहे. ऊसतोडीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे उकळून वजनमापातही काटेमारी सुरू आहे. या गंभीर समस्येकडे तालुक्यातील लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केले आहे. आपण कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या शासनाच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्षपद सोडल्याने चालू गळीत हंगामात निसाका व रासाकाची भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया रखडल्याने ऊस उत्पादकांचे भविष्यही अधांतरित झाले आहे. 

निफाडकरांना दिलेला शब्द पाळावा अन्यथा...

दोन्ही कारखाने चालू हंगामात भाडेतत्त्वावर देऊन ३० नोव्हेंबरपर्यंत निर्णय घ्यावा व आपण निफाडकरांना दिलेला शब्द पाळावा अन्यथा आपल्या मंत्रालयातील दालनात किंवा आपल्या शासकीय निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर १ डिसेंबरनंतर उत्पादकांच्या हितासाठी कोणत्याही क्षणी बेमुदत उपोषण किंवा ठिय्या आंदोलन करणार असल्याचे श्री. बोडके यांनी पत्रात म्हटले आहे. शेतकरीहितासाठी दोन्ही कारखान्यांची थकबाकी शासनाने खास बाब म्हणून स्वीकारून विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या आधिपत्याखालील पिंपळगाव बाजार समिती व (स्व.) अशोकराव बनकर पतसंस्थेला या हंगामात सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही खंडू बोडके-पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली. 

हेही वाचा > 'आज कुछ तुफानी' करणे चांगलेच भोवले! तब्बल सहा तासांनंतर भावंडांची सुटका 

उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार दिलीप बनकर यांनी वर्ष उलटूनही निसाका-रासाका कार्यान्वित करण्याचा शब्द न पाळल्याने ऊस उत्पादकांच्या भावना पोचविण्यासाठी आपण मुंबईत आंदोलन करणार आहोत. - खंडू बोडके, करंजगाव 

हेही वाचा > सोन्याचे बिस्किट हाती लागले पण श्रीमंत होण्याचे स्पप्न भंगले!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugarcane growers warn of hunger strike in front of Deputy Chief Minister's home nashik marathi news