निफाड तालुक्यात उसाला मिळेना तोड; वशिलेबाजी,ओल्या पार्ट्यांमुळे शेतकरी हवालदिल 

दीपक आहिरे
Sunday, 20 December 2020

आठ वर्षांपासून हक्काचे ‘निसाका’ व ‘रासाका’ हे दोन्ही साखर कारखाने बंद आहेत. आता ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणजे ऊसतोड करणारे कामगार मिळत नाहीत. ऊसतोडीसाठी कामगारांना अतिरिक्त एकरी पाच हजार रुपये देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर ऊसतोडीचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आठ वर्षांपासून हक्काचे ‘निसाका’ व ‘रासाका’ हे दोन्ही साखर कारखाने बंद आहेत. आता ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणजे ऊसतोड करणारे कामगार मिळत नाहीत. ऊसतोडीसाठी कामगारांना अतिरिक्त एकरी पाच हजार रुपये देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे ते हवालदिल झाले आहेत.

शेतकऱ्यांसमोर ऊसतोडीचा मोठा प्रश्‍न

निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदाही नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यापुढे ऊसतोडीसाठी हात जोडावे लागले. पण दर वर्षीप्रमाणे ऊसतोडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची यंदाही पिळवणूक थांबलेली नाही. अजूनही पाच हजार एकरवरील उसाचे क्षेत्र तोडणीच्या प्रतीक्षेत आहे. १८ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीचे ऊस झाल्याने काही ठिकाणी उसाच्या फडाला तुरे लागले आहेत. ऊसतोडणीसाठी वशिलेबाजी, उसाची तोडणी करायची असेल एकरी पाच हजार रुपये कामगार मागत आहेत. शिवाय मटणासह ओल्या पार्ट्या द्याव्या लागत आहेत. ऊसतोडणीचे गणित यंदा पूर्ण बिघडले असून, रब्बीचे पीक घेण्यासाठी उशीर होत आहे. 

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

मजूर टंचाईमुळे शेतकरी भरडला जातोय

कोळपेवाडी, संगमनेर, अगस्ती, दिंडोरीचा कादवा कारखान्याकडे नोंदणीनुसार उसाला तोड मिळेल का नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. दमदार पाऊस व गोदावरीच्या पाण्यामुळे यंदा गोदाकाठला उसाचे पीक जोमात बहरले आहे. पण तोडणी वेळेत न झाल्याने तुरे फुटू लागले आहेत. तुरे निघाल्याने ऊस पोकळ होऊन वजन घटण्याची चिन्हे आहेत. मजूर टंचाईमुळे शेतकरी भरडला जात आहे. टोळी मिळविण्यापासून ऊसतोड करेपर्यंत पैसे द्यावे लागत असल्याने शेतकरी या सर्व यंत्रणेसमोर हतबल झाले आहेत. यातच कारखान्याकडून सुरू असलेला काटामारीचा हिशेब कुठे काढायचा? असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..

शेतकरी झिजवताएत कारखान्यांचे उंबरठे

पिळवणुकीत होणारा खर्च बघता उत्पन्नाचा ताळमेळ बसणार नसल्याचे शेतकरी सांगतात. ऊसतोड द्यावी, यासाठी शेतकऱ्यांकडून सध्या कारखान्यांचे उंबरठे झिजवले जात आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या समस्येकडे कोणीही गांभीर्याने पाहत नसल्यामुळे व्यथा मांडायची कुणाकडे, अशी अवस्था झाली आहे. कुणी ऊसतोड टोळी देता का टोळी, अशी विनवणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sugarcane traders depressed for situation nashik marathi news